जगभरातून महत्वाच्या घडामोडी

हत्तीचा धुडगूस, तीन महिला ठार

छत्तीसगडमधील कोरबा जिह्यात हत्तीने धुमापूळ घातला. हत्तीच्या हल्ल्यात तीन अंगणवाडी कार्यकर्त्या महिलांचा मृत्यू झाला. गायत्री राठोड (48), तीज पुंवर (63) आणि सुरूजा (43) अशी या महिलांची नावे आहेत. या महिला सकाळी घराबाहेर पडल्या होत्या. परंतु रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या हत्तीने या महिलांवर हल्ला केला. त्यांना रुग्णालयात दाखल परंतु त्यांचा मृत्यू झाला.

बजाज फायनान्सला टॅक्सप्रकरणी नोटीस

बजाज फायनान्सला 341 कोटी रुपयांची कर चोरी केल्याप्रकरणी जीएसटी विभागाने नोटीस पाठवली आहे. बजाज फायनान्सवर चुकीच्या पद्धतीने सेवा शुल्क आणि व्याज शुल्क म्हणून दाखवल्याचा आरोप केला आहे. बजाज फायनान्सने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. कंपनीला 16 लाखांचे  व्याज भरावे लागू शकते.

एलआयसीची रोजची कमाई 116 कोटी

विमा कंपनी एलआयसीला पहिल्या तिमाहीत दररोज 116 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तसेच कंपनीचा महसूलही दोन लाख कोटी रुपयांच्या पार गेला आहे. प्रीमियममधून होणाऱ्या कमाईतही वाढ झालेली आहे. एलआयसीचा एपूण नफा चालू आर्थिक वर्ष एप्रिल-जूनच्या तिमाहीत 10 टक्के वाढून 10461 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत नफ्याचा आकडा 9544 कोटी रुपये होता. एलआयसीचा जूनच्या तिमाहीत एपूण नफा 210910 कोटी रुपये आहे, जो गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत 188749 कोटी रुपये होता, असे एलआयसीने गुरुवारी शेअर बाजाराला सूचित केले.

इराकमध्ये नवव्या वर्षी मुलींचे लग्न

इराकच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या विधेयकावर सध्या प्रचंड गदारोळ सुरू झाला. या विधेयकात मुलींच्या लग्नाचे वय किमान 9 वर्षे करण्याचा प्रस्ताव आहे. इराकच्या कायदा मंत्रालयाने हा प्रस्ताव संसदेत सादर केला. सध्या इराकमध्ये मुलींचे लग्नाचे किमान वय 18 वर्षे आहे. या विधेयकात अशीही तरतूद आहे की, कोणतीही व्यक्ती स्वतःसाठी किंवा त्याच्या कौटुंबिक बाबीचा निर्णय धार्मिक प्राधिकरण किंवा न्यायालय घेईल, याची निवड करू शकतो. या विधेयकाला विरोध करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वारसा, घटस्पह्ट आणि मुलांचा ताबा यासह अनेक अधिकारांचे उल्लंघन होईल.

गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी बुडाले

अमेरिकेतील मंदीच्या सावटाचा परिणाम आता जगभरात दिसू लागला आहे. शेअर मार्पेटमध्ये पडझड झाल्यानंतर आता क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत जोरदार घसरण सुरू आहे. बिटकॉइनच्या किमती अवघ्या एका आठवडय़ात 68 हजार डॉलरहून घसरून 56 हजार डॉलरपर्यंत खाली आल्या. यामुळे गुंतवणूकदारांचे 220 अब्ज डॉलर म्हणजेच 18.5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बिटकॉइन 17.5 टक्के, इथेरियम 30.1 टक्के, बिनास 20.6 टक्के, सोलाना 24.5 टक्के, एक्सआरपी 20.4 टक्के, डॉजकॉइन 28.7 टक्के, कार्डानो 22.9 टक्के आणि टॉनकॉइन 17.5 टक्क्यांनी घसरले.

संजय दत्तचा व्हिसा ब्रिटनने नाकारला

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याचा व्हिसा ब्रिटन सरकारने नाकारला आहे. यावर संजय दत्तने नाराजी व्यक्त केली असून ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी जे केले ते अत्यंत चुकीचे आहे. मला सुरूवातीला व्हिसा देण्यात आला होता. व्हिसा मिळाल्यामुळे मी माझे सर्व बुकिंग आणि प्लनिंग केले. परंतु, एका महिन्यानंतर माझा व्हिसा रद्द करण्यात आला. जर ब्रिटनला मला व्हिसा द्यायचा नव्हता तर पहिल्यांदा का दिला? मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मी प्रत्येक देशाच्या कायद्याचे पालन करतो. परंतु, हे का घडले, हे मी समजू शकलो नाही, असेही संजय दत्त म्हणाला.