जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी

शिक्षणाला वय नसतं… 81 व्या वर्षी कॉलेजात एन्ट्री

शिक्षणाला कोणतंही वय नसतं. इच्छा, जिद्द असेल तर कोणत्याही वयात शिकता येतं. चितौडगढ शहरातील प्रतापगढचे रहिवासी 81 वर्षीय सतपाल अरोरा यांनी हे दाखवून दिलंय. सतपाल अरोरा यांनी लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलंय आणि शिक्षण सुरू केलंय. अरोरा नियमितपण कॉलेजला जातात. आपल्यापेक्षा वयाने खूपच लहान असलेल्या विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करतात. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होतंय. 40 वर्षांनंतर कॉलेजची पायरी चढणाऱया अरोरा यांनी एमबीए केलं आहे.

डीजेच्या गाण्यामुळे नवरीने लग्न मोडले

लग्नसोहळा म्हटलं की डीजे आला. वरात आली. लोकांचा डान्स आला. परंतु डीजेवर एक गाणे वाजवले नाही म्हणून लग्न मोडल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे उघडकीस आली. नवरदेवाची वरात निघाल्यानंतर पाहुण्यांनी डीजेला एक आवडतं गाणं वाजवायला सांगितलं, परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. ते गाणे वाजवलं नाही. त्यामुळे वरातीमधील पाहुण्यांनी गोंधळ घातला. नवरीकडील आणि नवरदेवाकडील पाहुणे एकमेकांना भिडले. दोन्ही मंडळीत चांगलीच हाणामारी झाली. यात दोन्हीकडील मंडळी जखमी झाली. ही बातमी नवरीला समजताच तिने लग्न न करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला.

क्रेडिट कार्डला नकार वाढला; वापरात 45 टक्के घट

अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अधिक खर्च करतात. मात्र अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर कमी झालेला दिसून येतोय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 16 लाख क्रेडिट कार्ड जारी झाले होते. मात्र ऑक्टोबर 2024 मध्ये 7.8 लाख क्रेडिट कार्ड जारी झाले. म्हणजे या महिन्याचा विचार केला असता गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रेडिट कार्डच्या वापरात 45 टक्के घट झाली आहे. एक अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये 7.8 लाख नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले, तर मे 2024 मध्ये 7.6 लाख नवीन क्रेडिट कार्ड जारी झाले.

शूटिंग पूर्ण; ‘पुष्पा’ची एक्सवरून माहिती

अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पुष्पा-2’ चे शूटिंग पूर्ण झाले असून आता हा चित्रपट येत्या 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनने यासंबंधी एक पोस्ट शेअर करत शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली. सेटवर घेतलेल्या शेवटच्या शॉटचा फोटो शेअर करत शेवटचा दिवस आणि पुष्पाचा शेवटचा शॉट, पुष्पाचा पाच वर्षांचा पूर्ण झाला, असे अल्लू अर्जुनने म्हटले आहे. 2019 मध्ये ‘पुष्पा ः द राईज’चे शूटिंग सुरू झाले होते. आता दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

नोकरी! बीएसएफमध्ये 275 पदांसाठी भरती

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने 275 पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीसाठी 1 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. अर्ज भरण्यासाठी उमेदवार कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमदेवाराचे वय 18 ते 23 वर्षे असायला हवे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेवल 3 नुसार, 21,700 रुपये ते 69, 100 रुपये प्रति महिना मिळणार आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट www.bsf.gov.in वर देण्यात आली आहे.

सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्तीचे निधन

जगातील सर्वात जास्त वयोवृद्ध व्यक्ती जॉन अल्फ्रेड टिन्निसवूड यांचे निधन झाले. ते 112 वर्षांचे होते. सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून ते गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वांना परिचित होते. इंग्लंडमधील एका केअरहोममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टिन्निसवूड यांचा जन्म 26 ऑगस्ट 1912 साली झाला होता. टिन्निसवूड यांना एप्रिलमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून सर्वात जास्त वयोवृद्ध व्यक्ती असल्याचा खिताब मिळाला होता.

डॉ. भट्टाचार्य अमेरिकेत एनआयएचचे संचालक

हिंदुस्थानी वंशाचे फिजिशियन आणि अर्थतज्ञ डॉ. जय भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या (एनआयएच) संचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने घेतला आहे, अशी माहिती स्वतः भट्टाचार्य यांनी एक्सवरून दिली आहे. जय भट्टाचार्य हे मूळचे कोलकाता येथील आहेत. एनआयएचचे संचालक म्हणून भट्टाचार्य 27 संस्थांवर देखरेख करतील. या संस्था लस तयार करण्याचे आणि साथीच्या आजारांसाठी नवे औषध विकसित करण्याचे काम करतात.