जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी

सावधान! 150 रुपयांत खासगी डेटा विक्रीला

तुमची वैयक्तिक माहिती 150 ते 300 रुपयांत विकली जातेय… काय, ऐकून धक्का बसला ना… तुमची फ्लाईट डिटेल्स, ब्रॉडबॅण्ड कनेक्शन, कार इन्शुरन्स एवढेच नव्हे तर तुम्ही कोणता म्युच्युअल फंड खरेदी केला, ही सगळी माहिती डेटा कलेक्टर्सच्या हाती लागते. कॉल सेंटर, बीपीओ आणि टेलिमार्पेटींग कंपन्यांचे कर्मचारी ही माहिती खरेदी करत आहे. विविध मार्गाने ग्राहकांचा डेटा लीक होत असून हा एक मोठा धंदा असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. लीड जनरेशन म्हणजे एखाद्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट असणाऱया संभाव्य ग्राहकांची नावे.

है तयार हम…

ऑस्ट्रेलियात 20 सप्टेंबरपर्यंत होणाऱया सर्वात मोठा युद्धाभ्यास काकाडूमध्ये सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानी नौदलाचे पी81 विमान डर्विनला पोहोचले. या युद्धाभ्यासात जगातील 30 हून अधिक देशांचे नौदल सहभागी झाले आहेत. आयएनएस 316 चे कमांडिंग ऑफिसर पॅप्टन अजय पंवर यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी नौदल आपल्या कवायती दाखवणार आहे. या युद्ध अभ्यास यामुळे जगातील नौदलातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे.

श्रीलंकेत 21 सप्टेंबरला राष्ट्रपतीपदासाठी मतदान

श्रीलंकेत पुढील आठवडय़ात 21 सप्टेंबरला राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. या वेळेस 38 पेक्षा जास्त उमेदवार राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. परंतु मुख्य लढत ही नॅशनल पीपल्स पॉवरचे (एनपीपी) अनुरा कुमारा दिसनायके, समागी जन बालवेगयाचे (एसजेबी) विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा, राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांचे पुत्र नमल या चार उमेदवारांमध्ये होणार आहे. 2019 मध्ये काका गोटा बाया राजपक्षे सत्तेवर आले होते. परंतु 2022 मध्ये जनआंदोलनाच्या रेटय़ामुळे त्यांना देश सोडावा लागला.

सोन्याचा भाव पुन्हा 72 हजार पार, चांदीही महागली

सराफा बाजारात सोन्याच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ झाली. सोने 472 रुपयांनी महाग झाले असून चांदीच्या दरात 747 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 72022 रुपयांवर पोहोचला. तर चांदी 747 रुपयांनी वधारून 82,954 रुपये प्रति किलोवर पोहोचली. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,972 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. जीएसटीचा समावेश केल्यास सोन्याचा भाव 74,182 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

जिओने लाँच केला स्वस्त फोन

रिलायन्स जिओने नवीन 4 जी फीचर फोन लाँच केला. त्याचे नाव जिओ फोन प्रायमा 2 आहे. गेल्यावर्षी जिओने प्रायमा फोन लाँच केला होता. त्याची ही नवीन सीरीज आहे. फोनची किंमत 2799 रुपये आहे. या पह्नमध्ये युपीआय पेमेंटसह अनेक फीचर्स आहेत. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सावन असे अनेक अॅप आहेत. त्यामध्ये 2000 एमएएचची मोठी बॅटरी आहे. 512 एमबी रॅम, 4जीबी ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

दोन बँकांना 2.91 कोटींचा दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेविरोधात मोठी कारवाई केली. या दोन बँकांना एकूण 2.91 कोटी रुपयांचा दंड आरबीआयने ठोठावला आहे. आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑक्सिस बँकेवर 1.91 कोटी रुपये तर एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेच्या ग्राहकांच्या देवाणघेवाणीवर कोणताही परिणाम होणार नाही.

युनियन बँकेत 500 पदांसाठी भरती

युनियन बँकेत 500 पदांसाठी भरती केली जात आहे. या पदांपैकी महाराष्ट्रात 56 पदे भरली जाणार आहेत. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी 1 वर्षाचा असणार असून ट्रेनिंगदरम्यान उमेदवारांना दरमहा 15 हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी 17 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. उमेदवाराने 2020 नंतर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जाचे शुल्क 800, 600 आणि 400 रुपये आहे.

अभ्यासाच्या टेन्शनमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

आई, बाबा सॉरी. मला अभ्यासाचे टेन्शन आले आहे. त्यामुळे मी जगाचा निरोप घेत आहे. अशा आशयाची चिठ्ठी लिहून चंद्रपूर येथील विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. चंद्रपूर येथील जिल्हा संकुल परिसरात असलेल्या इन्स्पायर या खासगी ट्युशन क्लासमध्ये नीटची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय प्रांजली हनुमंत राजुरकर या विद्यार्थिनीने अभ्यासाच्या टेन्शनमुळे जिवन संपवले. तिच्या मोबाइलमध्ये आत्महत्येपुर्वीची चित्रफीतही आढळून आली आहे. प्रांजली मूळची यवतमाळ जिह्यातील मारेगाव तालुक्यातील रहिवासी होती.

शिका रिस्क मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत जोखमी व्यवस्थापनाचा रिस्क मॅनेजमेंट कोर्स सुरू करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त या कोर्सेसमध्ये 300हून अधिक जोखीम क्षेत्रांचा अभ्यास करता येणार आहे. याकरिता नुकताच गरवारे शिक्षण संस्था आणि यूकेतील प्रतिष्ठत इन्स्टीट्यूड ऑफ रिस्क मॅनेजमेंट्स इंडिया एफिलिएट संस्थेशी शैक्षणिक सांमजस्य करार करण्यात आला आहे.

कृषी अभ्यासक्रमाला पंसती

राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये तीन केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून यंदा 76 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. विद्यार्थ्यांचा कल कृषी अभ्यासक्रमाकडे वाढला असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी प्रवेश वाढले आहेत. 15 सप्टेंबर दरम्यान महाविद्यालय स्तरावर व व्यवस्थापन फेरीद्वारे प्रवेश होणार असल्याने प्रवेशांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.