क्रीडा जगत

बाबर, आफ्रिदीची पुन्हा विकेट

पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानी संघाला बाहेर काढण्यासाठी नव्या निवड समितीने धाडसी आणि कठोर निर्णय पुन्हा घेतले आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी या स्टार खेळाडूंना वगळण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता. त्यानंतर आता दुबळ्या भासणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धही या तिघांसह मोहम्मद रिझवानलाही वन डे आणि टी-20 मालिकेत विश्रांतीच्या नावाखाली वगळण्याची शक्यता आहे. क्रिकेट पाकिस्तानच्या माहितीनुसार झिम्बाब्वे मालिकेसाठी निवड समितीकडून वरिष्ठ खेळाडूंना बाहेर ठेवण्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

गुकेश, अर्जुनची विजयी सलामी

युरोपियन क्लब बुद्धिबळ कपमध्ये हिंदुस्थानच्या डी. गुकेश, अर्जुन एरीगेसी यांनी विजयी सलामी दिली, तर आर. प्रज्ञानंदाला गोडेर्ट फ्रँकॉईसशी झालेल्या सामन्यात हार पत्करावी लागली. या स्पर्धेत हिंदुस्थानचे अव्वल 13 बुद्धिबळपटू खेळत असून उद्या विदित गुजराती, निहाल सरीन खेळणार आहेत.

मयंक हिंदुस्थानी गोलंदाजीचे भविष्य

अवघा हिंदुस्थान मयंक यादवच्या वेगवान गोलंदाजीच्या प्रेमात पडला असताना मोहम्मद शमीनेही त्याचे भरभरून कौतुक केले आहे. तोच हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजीचे भविष्य आहे. मयंकसह हर्षित राणा वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार, असेही भाकीत वर्तवले.

न्यूझीलंडच्या जगज्जेत्या मालामाल

महिला टी-20 वर्ल्ड कपचे प्रथमच जगज्जेतेपद पटकावणारी न्यूझीलंडची महिला टीम 2.3 दशलक्ष डॉलर्सचाही पुरस्कार जिंकली. तब्बल 19.33 कोटी रुपयांची ही रक्कम न्यूझीलंड संघातील सर्व महिला खेळाडूंमध्ये वितरित केली जाणार आहे. प्रत्येकीला सुमारे सवा कोटीपेक्षा अधिक रक्कम दिली जाईल.

वेंगसरकर अकादमीची चाचणी उद्या

माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने 13 ते 19 या वयोगटातील मुलांसाठी 23 ऑक्टोबरला दुपारी 3 ते 6 या वेळेत निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून 1 सप्टेंबर 2005 ते 31 ऑगस्ट 2012 या दरम्यानच्या काळात जन्मलेली मुले या चाचणीसाठी पात्र ठरतील. या निवड चाचणीच्या अधिक माहितीसाठी अमित जाधव यांच्याशी
(8655337885/7021147475) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.