कल्याण, भिवंडीसह उल्हासनगरला मुसळधार पावसाचा इशारा; पालघर, नाशिकमध्येही जोरदार पावसाचा अंदाज

गणतीच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता हवामान विभागाने ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यासह पुणे, साताऱ्याती घाटमाथ्यावर जोरधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याणमध्येही मुसळधार पवासाचा इशारा दिला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कल्याण, भिवंडी, उल्हासनगरसह आजूबाजूच्या परिसरात पुढीत 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांसह पुणे, सातारा जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पुढील तीन ते चार तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग जमा झाल्याचे उपग्रहद्वारे घेतलेल्या फोटोतून दिसत आहे.