मी इमानदार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा! मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

निवडणुकीतून माघार घेतली हा विषय आता संपला. आमच्यासाठी निवडणूक नाही, तर आरक्षण हा विषय महत्त्वाचा आहे. आरक्षणाच्या आंदोलनात मराठा समाजाने दिलेले योगदान मी वाया जाऊ देणार नाही. मी योग्यच केले आहे. मी इमानदार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार का घेतली, याबद्दल सविस्तर खुलासा केला. राज्यात सहा कोटी मराठा लोकसंख्या आहे. पण तरीही केवळ बोटावर मोजण्याएवढे लोकही निवडून आले नसते. कारण एका जातीच्या मतांवर निवडून येत नाही. हे सगळे मला सहन झाले नसते. म्हणूनच निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता हा विषय संपला आहे. आमच्यासाठी आरक्षण हा अस्मितेचा विषय आहे, असेही ते म्हणाले.

पाडापाडी तर होणारच!

राज्यात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतलेली असली तरीही पाडापाडी ठरलेली आहे आणि ती होणारच, असे मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले. मराठा आरक्षणाच्या वाटेत ज्यांनी काटे पेरले त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल, असा इशाराही त्यांनी दिला. निवडणुकीत मराठा समाजाची ताकद किती आहे हे दिसेल, असेही ते म्हणाले.