अनधिकृत होर्डिंग्ज वरून पालिका आणि रेल्वे प्रशासनाला ढकलाढकलीचा कारभार

सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सून पूर्व पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी दुपारच्या सुमाराला अचानक आकाशात दाटून आलं आणि धुळीचं वादळ सगळीकडे पसरलं. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊसही मुंबईच्या अनेक भागात कोसळला. दरम्यान, या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोलपंपावरील होर्डिंग कोसळलं आणि त्याखाली दबल्याने 8 जणांचा मृत्यू झाला.

हे होर्डिंग अनधिकृत असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यावरून आता बीएमसी आणि रेल्वे प्रशासनाचा ढकला ढकलीचा कारभार सुरू झाला आहे. हे होर्डिंग ज्या ठिकाणी होतं, ती जागा रेल्वे प्रशासनाची असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. ही जागा केंद्रीय रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे पोलीस विभागाची आहे, असा दावा बीएमसीने केला आहे.

तर, सीएनबीसी टीव्ही 18 या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार ही जागा बीएमसीची नसल्याचं स्पष्टीकरण पालिकेने दिलं आहे. या संबंधीच्या एक्स पोस्टला प्रतिक्रिया देताना रेल्वेनेही आपला या जागेशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. रेल्वेने हे होर्डिंग रेल्वेच्या जमिनीवर नसून त्या जमिनीशी तसंच होर्डिंगशी रेल्वेचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.