बेकायदेशीर धर्मांतरप्रकरणी मौलाना कलीम सिद्दीकीसह 12 जणांना जन्मठेप; लखनऊच्या विशेष NIA कोर्टाचा निकाल

बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी लखनऊच्या विशेष NIA न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी मोहम्मद उमर गौतम आणि मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यासह एकूण 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या सर्वांना दोषी ठरवण्यात आले होते. तसेच या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या आणखी चारजणांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लखनऊच्या विशेष NIA न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला.

काय आहे नेमकं प्रकरण?

मोहम्मद उमर गौतम आणि इतर आरोपी एका कटाचा भाग म्हणून धार्मिक द्वेष पसरवून देशात बेकायदेशीर धर्मांतराची टोळी चालवत होते. त्यांचे इतर देशांतही संबंध आहेत. यासाठी हवालाद्वारे विदेशातून पैसे पाठवण्यातही आरोपींचा हात असल्याचा आरोप होता. तसेच गरीब महिला आणि अपंगांना आमिष दाखवून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचे धर्मांतर करत होते, असे विशेष सरकारी वकील एमके सिंग म्हणाले.

मोहम्मद उमर गौतम याला 20 जून 2021 रोजी दिल्लीच्या जामियानगर येथून अटक करण्यात आली होती. मोहम्मद उमर गौतम आणि त्याचे साथीदार हे एक संघटना चालवत होते. ही संघटना उत्तर प्रदेशात मूकबधीर विद्यार्थी आणि गरीबांना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचे काम करत होते. यासाठी त्यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून निधी मिळत असल्याचा संशय आहे.