स्वत:ला विकू शकतात ते महाराष्ट्राला काय सोडणार? आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात झंझावात

 ‘‘हे दमदाटीचे सरकार तुम्हाला चालणार आहे का? तिघेही मुख्यमंत्र्यांसारखे वागतात. एकाकडे कुणी गेलं तर दुसऱ्याला राग येतो. जे स्वतःला विकू शकतात ते महाराष्ट्राला काय सोडणार? हे आता हिंदुत्व, देशभक्ती शिकविण्याचे थोतांड करीत आहेत,’’ असा घणाघात करतानाच, ‘‘रक्तारक्तात लाल, निळा, पिवळा असा भेदभाव करणारे आमचे हिंदुत्व नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आमचे हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम, असे आमचे हिंदुत्व आहे,’’ असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर येथे केले.

पश्चिम महाराष्ट्रातील झंझावाती ‘महान्याय, महानिष्ठा’ दौऱ्याचा प्रारंभ आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातून केला. यावेळी आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी तरुणाईची प्रचंड गर्दी झाली होती. भुदरगड तालुक्यातील गारगोटी आणि मिरजकर तिकटी येथे आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या. या सभांना कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्या जास्त आणि माणसे कमी असतात. त्यामुळे खुर्च्या लपवाव्या लागतात. पण ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. इथे खुर्च्या जास्त लावल्या तरी पुरत नाहीत.’’ या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेत स्वतःच्या शेतामध्ये दोन हेलिपॅड बनविणारे हे ‘गरीब मुख्यमंत्री’ असल्याचा टोला लगावला. ‘‘हे असे खोकेवाले आणि धोकेवाल्यांवर किती विश्वास ठेवायचा, याचा विचार करण्याची गरज आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी क्रांतिज्योतीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आदमापूर येथे श्री बाळूमामांचे आणि सायंकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

 ‘‘आमदार अपात्रतेचा निकाल जो काही लागेल तो लागेल; पण त्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना जाऊन भेटणे हे चुकीचे असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेल्या संविधानाप्रमाणे विधानसभा अध्यक्ष वागले तर चाळीस गद्दार नक्की बाद होतील,’’ असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरची जागा जिंकूच!

‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर, ‘‘आम्ही देशभक्त पक्षांची आघाडी आहोत. आम्ही संविधान बदलू देणार नाही. लोकशाही मारू देणार नाही. म्हणून आम्ही वेगवेगळ्या राज्यांतून वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आलो आहोत. तसेच आम्ही ‘इंडिया’ आघाडी म्हणून नक्की कोल्हापूरची जागा जिंकू,’’ असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

मंत्रालयदेखील गुजरातला नेतील

वेदान्ता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क असे महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलेले असंख्य प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले. ‘महानंदा’सारखे आणखी काही प्रकल्प गुजरातला पळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘‘हे सरकार टिकलं तर हे मंत्रालयदेखील सुरत, अहमदाबादला नेतील,’’ असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांच्या सभांमध्ये शिवसेना नेतेसचिव, खासदार अनिल देसाई, आमदार वैभव नाईक, उपनेतेजिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेतेसंपर्कनेते नितीन बानुगडेपाटील, उपनेतेजिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.