आयडॉलच्या प्रश्नपत्रिका बदलाची चौकशी

कारवाई करण्याचे कुलगुरूंचे आश्वासन, युवासेनेच्या मागणीला यश

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमधील पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या (एमएमएस) विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ऐन परीक्षेवेळी प्रश्नपत्रिका कशी बदलण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली असून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिले.

आयडॉलमधील प्रथम वर्ष मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या (एमएमएस) दुसऱया सत्रातील फायनान्शिअल मॅनेजमेंट विषयाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रथम सत्रातील फायनान्शिअल अकाऊंट विषयासंदर्भातील प्रश्नपत्रिका देण्यात आली. प्रश्नपत्रिकेवर फायनान्शिअल मॅनेजमेंट हाच विषय नमूद करण्यात आला होता. मात्र पेपरमधील प्रश्न मात्र फायनान्शिअल अकाऊंट विषयाच्या संदर्भात विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीच ही बाब शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी ईमेलद्वारे याप्रकरणी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली.

युवासेनेच्या तक्रारीची कुलगुरूंनी दखल घेतली असून नुकतीच रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आयडॉलच्या विद्यार्थ्यांना होत असलेल्या विविध समस्यांचा पाढा युवासेनेने वाचला आणि निवेदन देऊन संयुक्त बैठकीची मागणी केली. प्रवेशप्रक्रिया झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत मिळत नाही. आवश्यक तासिकादेखील होत नाहीत. परीक्षेला सेंटर्स उपलब्ध नसतात. पूर्णवेळ संचालकच नाहीत. अशा विविध समस्या यावेळी कुलगुरूंसमोर मांडण्यात आल्या. तसेच प्रश्नपत्रिका बदलाबाबत चर्चादेखील केली असता एकसदस्यीय चौकशी समिती गठीत केल्याचे सांगून पुढील आठवडय़ात त्याबाबत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले. याप्रसंगी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि शिवसेना उपनेत्या शीतल शेठ देवरुखकर उपस्थित होते.