वेस्ट इंडीजने केला इंग्लंडचा गेम; विंडीज, द.आफ्रिका उपांत्य फेरीत; इंग्लंडचे आव्हान संपुष्टात

विजयाची हॅटट्रिक करत ‘ब’ गटात अव्वल असलेल्या इंग्लंडला वेस्ट इंडीजने शेवटच्या साखळी सामन्यात अक्षरशः रडवले. कर्णधार हेली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफच्या झंझावाती अर्धशतकी खेळी आणि शतकी सलामीने इंग्लंडचा 6 विकेट राखून पराभव केला आणि आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विंडीजने 2 षटकांआधीच विजय मिळवत ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले आणि या पराभवामुळे इंग्लंडवर साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढावली. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज अशा उपांत्य लढती रंगतील.

आज वर्ल्ड कपच्या अखेरच्या साखळी लढतीपूर्वी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका 6 गुणांसह पहिल्या आणि दुसऱया क्रमांकावर होते. इंग्लंडने नॅट शिवर-ब्रंटच्या 50 चेंडूंतील 57 धावांच्या खेळीच्या जोरावर विंडीजसमोर 7 बाद 141 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली होती. विजयासाठी आवश्यक 142 धावांचा पाठलाग करताना कर्णधार मॅथ्यूज आणि जोसेफने इंग्लिश गोलंदाजांना पह्डून काढत अवघा सामनाच फिरवला. डावातील दुसऱयाच षटकांत कियाना जोसेफचा बदली खेळाडू सोफी डंकलीने सीमारेषेवर सोपा झेल सोडला. तेव्हा कियाना अवघ्या 7 धावांवर होती. हा झेलच इंग्लंडला महागात पडला. मग या दोघींनी 12 षटकांतच 102 धावांची घणाघाती सलामी दिली आणि विंडीजचा विजयही जवळजवळ निश्चित केला. 38 चेंडूंत 2 षटकार आणि 6 चौकार ठोकत 52 धावा फटकावल्यावर ही जोडी फुटली. मग पुढच्या षटकात हेलीसुद्धा 50 धावांवर बाद झाली. त्यानंतर डिआंद्रा डॉटीनने 27 धावा चोपून काढत विंडीजला विजयासमीप नेले आणि अखेर विंडीजच्या महिला संघाने 18 व्या षटकांतच विजयी धाव काढत स्वतः उपांत्य फेरी गाठली आणि इंग्लंडला साखळीत गारद केले. तब्बल 14 सामन्यांत वेस्ट इंडीजने प्रथमच इंग्लंडवर मात केली. विंडीजच्या या अभूतपूर्व विजयामुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.