Women’s T20 World Cup 2024 – ICC ने जाहीर केला अव्वल 12 खेळाडूंचा संघ, टीम इंडियासाठी मोठा धक्का

टी20 वर्ल्ड कपच्या अंतीम सामन्यात न्यूझीलंडने दमदार खेळाचे प्रदर्शन करत पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. फायनलमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्यानंतर नुकताच आयसीसीने टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगले प्रदर्शन केलेल्या अव्वल 12 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. मात्र, या संघात टीम इंडियाच्या फक्त एका खेळाडूला आपली जागा पक्की करता आली आहे.

टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपमधील खेळ सुमार राहिला होता. त्यामुळे साखळी फेरीतच वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची नामुष्की संघावर ओढवली. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने वर्ल्ड कपमध्ये चांगली फलंदाची केली होती. त्यामुळे तिच्या या खेळाचं कौतुक म्हणून आयसीसीने टी20 वर्ल्ड कपच्या अव्वल 12 खेळाडूंमध्ये तिला स्थान दिले आहे. या संघाच्या कर्णधारपदाची धुरा दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्ड्टकडे सोपवण्यात आली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या या संघात टी20 वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम खेळाडू न्यूझीलंडची एमेलीया केर हीचा सुद्धा समावेश आहे. एमेलीया केरने अंतिम सामन्यासह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली. याव्यितिरक्त दक्षिण आफ्रिकेच्या तझ्मीन ब्रिट्स आणि नोनकुलुलेको एमलाबा, इंग्लंडच्या डॅनी वॅट-हॉज, वेस्ट इंडिजची डिएंड्रा डॉटीन आणि अॅफी फ्लेचर, ऑस्ट्रेलियाची मीगन शूट, यष्टीरक्षक म्हणून बांगलादेशची निगर सुल्ताना आणि न्यूझीलंडकडून रोसमेरी मैर आणि 12 वी खेळाडू म्हणून इडन कार्सन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.