सरकारचे कोणतेही षडयंत्र उधळून लावणार, आता माघार नाही; मनोज जरांगे यांचा निर्धार

सरकारने कोणतेही षडयंत्र रचले तरी ते षडयंत्र आपण उधळून लावणार आहोत. तसेच आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याने जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळए सरकारने मराठा समाजला आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला आपण सळो कि पळो करून सोडू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. पाथर्डी तालुक्यातील आगासखांड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी मराठा समाजासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या. मात्र, तरीही सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. आपल्याला आणखी वेळ द्यावा, असे शासन म्हणत असले तरीही या पूर्वी सात महिन्यांचा अवधी देऊनही आमची मागणी अजून मान्य केली नाही. तसेच अद्याप प्रमाणपत्रेही दिली नाही. मराठे कोणाला घाबरत नाही हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. मराठा समाज एकवटला असल्याने तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला. समाजाने दिलेल्या आशिर्वादाच्या बळावरच मी मुंबईला जात आहे. तेथून परत येईल की नाही हे मला माहित नाही. मात्र, मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन सुरू ठेवा. वेळप्रसंगी हातातील कामे सोडून रस्त्यावर उतरा. आपल्या मतांच्या जीवावर यांनी राजकरण केले असून आता आरक्षण दिले नाही तर यांना सळो कि पळो करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे जरांगे म्हणाले.

सध्या माझी तब्बेत बरी नाही. आता तुम्हीच माझे माय बाप आहात. मी मरणाला घाबरत नाही. माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी घालवणार आहे. मला कोणत्याही गोष्टीचा मोह नसल्याने कोणतेही आमिष मला सरकार देऊ शकत नाही. मी सरकारला मॅनेज होत नसल्याने सरकारची अडचण झाली आहे. माझा जीव गेला तरीही बेहत्तर पण आरक्षण मिळाल्याशिवाय आता मी माघार घेणार नाही. तुम्हीच माझे कुटुंब असून मी माझ्या घरीही सात महिने झाले तरीही गेलेलो नाही. माझ्या पाठीशी तुम्ही ताकदीने उभे राहण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय लावून आता आपल्याला गुलाल उधळायचा आहे. गुलाल उधळण्यासाठी आता सज्ज व्हा. माझ्या मुंबई येथील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.