भेलप्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण

भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित भेलप्रकल्पग्रस्त प्रकरणी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुंडीपार, खैरी, बाम्हणी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजय नवखरे यांच्या नेतृत्वात  साखळी उपोषण सुरू केले आहे. भेलप्रकल्प पूर्णत्वास न्या अन्यथा आमच्या जमीनी परत करा अशी मागणी शेतकरी संघटनांनी राज्य शासनाकडे केली आहे.

गेल्या दहा वर्षापासून भेलप्रकल्प रखडलेला आहे. रोजगार उपलब्ध करण्याच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या जमीनी सरकारने अधिग्रहीत केल्या. मात्र अद्याप ना नोकरी ना रोजगार अशी केविलवाणी परिस्थिती भेलप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे.

आपल्या मुलांना नोकरी मिळेल व परिसरातील स्थानिकांना रोजगार मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी आपल्या पोटची भाकर शासनाला दिली. परंतु राजकीय सुडापोटी व वर्चस्व मिळवण्याच्या नादात प्रकल्प गेल्या 11 वर्षांपासून रखडला आहे. दोन दिवसांपूर्वी एका प्रकल्पगस्त शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवले. यामुळे शेतकरी आक्रमक झाली असून साखळी उपोषणाला बसली आहे.