मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी शेकडो बसेस बुक; चाकरमान्यांचे हाल, ठाणे बस स्थानकावर तुफान गर्दी

महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाणे दौऱ्यावर आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वालावलकर मैदानात आज जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महापालिकेच्या परिवहन सेवेतील निम्म्यापेक्षा जास्त बसेस पंतप्रधानांच्या सभेला जाणार असल्याने प्रत्यक्ष रस्त्यावर फार कमी बसेस धावत आहेत. मोदींच्या या दौऱ्यामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले आहेत.

नवी मुंबई महापालिकेने 300, ठाणे महापालिकेने 250, मीरा-भाईंदर महापालिकेने 125 आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने 79 बसेस मोदींच्या सभेला महिलांना नेण्यासाठी वळवल्या आहेत. मोदींच्या सभेचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून आता ठाण्यातील स्टेशन परिसरातील बस स्टॉपवर चाकरमान्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत. त्यामुळे  कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चाकरमान्यांच्या नाकी नऊ येणार आहेत. चाकरमान्यांना होणाऱ्या या त्रासामुळे नागरिकांनी मोदी सरकारचा निषेध केला आहे.

मोदींच्या कार्यक्रमासाठी टीएमटीच्या तब्बल 250 बस वळविण्यात आल्या असून फक्त 150 बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय खारेगाव टोलनाका आणि कशेळी टोलनाकामार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली असून सर्व ट्रान्सपोर्ट, वेअर हाऊस संघटना, वाहनचालक व मालकांना आदेश देण्यात आले आहेत.