शहापुरातील मोदी आवास योजनेतील घरांना घरघर; 737 लाभार्थ्यांचे पैसे सरकारने लटकवले

शहापुरात मोदी आवास योजनेला घरघर लागली आहे. मंजूर केलेल्या 755 लाभार्थ्यांपैकी केवळ 18 लाभार्थ्यांचे सर्व पैसे दिले असून 737 घरकुलांचा निधी सरकारने लटकवला आहे. याबाबत सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही पदरी निराशा येत असल्याने घरांचे बांधकाम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे शेकडो गोरगरीब लाभार्थ्यांना भरपावसाळ्यात नातेवाईकांकडे दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. त्यातच बहुतांश लाभार्थ्यांनी उसनवारी करून विटा, वाळू, सिमेंट आणून कामे केली खरी. मात्र आता या पैशांसाठी व्यापाऱ्यांचा तगादा लागल्याने लाभार्थी मेटाकुटीला आले आहेत.

शहापूर तालुक्यात मोदी आवास योजनेतून सन २०२३-२४ या वर्षी एकूण ७५५ घरकुले मंजूर झाली आहेत. घरकुलासाठीचे मंजूर अनुदान लाभार्थ्याला चार टप्प्यांत देण्यात येते. यातील ७३९ लाभार्थ्यांना १५ हजारांचा पहिला हप्ता देण्यात आला असून १६ लाभार्थी वंचित आहेत. मात्र ४५ हजारांचा दुसरा हप्ता अवघ्या ३९० लाभार्थ्यांना मिळाला असून ३६५ लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत. ४० हजारांचा तिसरा हप्ताही अवघ्या १७० लाभार्थ्यांना मिळाला असून ५८५ लाभार्थी वंचित आहेत. हीच अवस्था अंतिम हप्त्याची असून अवघ्या १८ लाभार्थ्यांनाच पैसे दिले आहेत. उर्वरित ७३७ लाभार्थी निधीपासून वंचित आहेत. त्यामुळे घरांची कामे अपूर्ण राहिली असून अनेकांना नातेवाईकांकडे राहण्याची वेळ आली आहे, तर काहीजण भाड्याने राहत असल्याची माहिती आवोरोशील मोटाराकर या लाभार्थाने दिली आहे

पैसे देता येत नाही तर योजना जाहीर का करता?
घरकुल योजनेचे १लाख २० हजारांचे अनुदान वेळेवर मिळणारच या आशेने अनेकांनी व्याजावर पैसे घेऊन घरांचे बांधकाम सुरू केले. तसेच बांधकामांसाठी लागणारे दगड, विटा, सिमेंट, पत्रे, लोखंड, दरवाजे, खिडक्या उसनवारीवर आणल्या आहेत. मात्र सरकारने पैसे लटकवल्याने व्यापाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे संतापलेल्या लाभार्थ्यांनी पैसे देता येत नाही तर योजना जाहीर का करता, असा सवाल केला आहे.

घरकुल टप्प्याटप्प्यात जसे पूर्ण होईल तसे चार टप्प्यांत शासनाकडून ऑनलाइन हप्ते मागविले आहेत. निधी उपलब्ध झाल्यास घरकुल लाभार्थ्यांना निधी तत्काळ दिला जाईल.
– भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी पंचायत समिती, शहापूर