दूषित पाणी, दर्जाहीन अन्नामुळेच वसतिगृहातील मुलींना विषबाधा; शिवसेनेच्या प्रश्नावर सरकारकडूनच हलगर्जीपणाची कबुली

सेवासुविधांसाठी पाच सदस्यीय समिती
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील विद्यार्थिनींना काही दिवसांपूर्वी झालेली विषबाधा दूषित पाणी आणि दर्जाहीन अन्नामुळेच झाल्याची कबुली सरकारकडूनच देण्यात आली. यामुळे सरकारच्या हलगर्जीपणा उघड झाला आहे. याबाबत शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सवाल उपस्थित करीत विद्यापीठाच्या वसतिगृहातील दुरवस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये गैरसोयी असल्याचे मान्य केले. विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील वसतिगृहात राहणाऱया 40 हून अधिक विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात दूषित पाणी आणि निकृष्ट अन्नामुळे विषबाधा झाल्याचे समोर आले होते. पालिकेकडून होणाऱया दूषित पाणीपुरवठय़ामुळे, कुलरच्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थिनींच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्याचे शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी निदर्शनास आणून दिले होते. यावेळी सरकारकडून बाहेरगावावरून आल्यामुळे प्रकृती बिघडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा दूषित पाणी आणि अन्नामुळे झाल्याचे शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांनी निदर्शनास आणून दिले. शिवाय विद्यापीठात अनेक गैरसोयी असल्याचेही ते म्हणाले. यावर सरकार काय उपाययोजना करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.