Hockey Asian Champions Trophy 2024 – टीम इंडियाचे वादळ! चीनचा फडशा पाडल्यानंतर जपानचाही सुपडा साफ

टीम इंडियाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या धमाकेदार खेळाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. टीम इंडियाने स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला असून जपानला 5-1 अशा फरकाने धुळ चारली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात चीनचा 3-0 अशा फरकाने फडशा पाडला होता.

Paris Olympics 2024 कांस्य पदक विजेत्या टीम इंडियाने आपला धमाकेदार खेळ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा कायम ठेवला आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात चीनचा पराभव केल्यानंतर स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात जपानचा 5-1 अशा फरकाने एकतर्फी पराभव केला. टीम इंडियाकडून सुखजीत सिंह याने दोन गोल करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली. त्याचबरोबर अभिषेक, संजय आणि उत्तम सिंह यांनी 1-1 गोल करत संघाचा विजय निश्चित केला. जपानकडून एकमेव गोल काझुमासा मात्सुमोटो याने 41 व्या मिनिटाला केला.

टीम इंडियाचा पुढचा सामना आता 11 सप्टेंबरला मलेशियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 12 सप्टेंबरला कोरिया आणि 14 सप्टेंबरला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया दोन हात करणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल 16 सप्टेंबरला आणि फायनल 17 सप्टेंबरला खेळवली जाणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक 4 वेळा टीम इंडियाने जिंकली आहे. त्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक असून त्यांनी 3 वेळा हा किताब पटकावला आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान व्यतिरिक्त कोरियाने 2021 साली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते.