खोटा इतिहास लोकांच्या माथी मारू नका, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सुनावले

खोटा इतिहास लोकांच्या माथी मारू नका, अशा शब्दांत इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांबद्दल सांगितलेल्या खोटय़ा इतिहासाबद्दल संताप व्यक्त केला आहे. औरंगजेबाचे सुरत हे बंदर शिवाजी महाराजांनी  1664 आणि 1670 असे दोनवेळा लुटले आहे. तेथील व्यापाऱ्यांकडून प्रचंड संपत्ती लुटून त्यानी आणली होती. पहिल्या सुरत लुटीच्या वेळी तेथील जो सुभेदार होता इनायत खान याने दूत पाठवले आणि त्यासोबत मारेकरीही पाठवला, शिवाजी महाराजांना तिथे दगाफटका करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मावळ्यांनी त्यावेळी सुरतला आगही लावली होती, सुरत बेचिराखही केली होती. हा आपला इतिहास आहे. मोघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी या लुटीचा उपयोग करून घेतला होता. आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस खोटा इतिहास सांगत आहेत, ती त्यांची राजकीय रणनीती असावी. कारण, शिवाजी महाराजांची जी वाघनखे नव्हती ती वाघनखे म्हणून सांगितले, त्याचे प्रदर्शन केले. अशा अनेक गोष्टी खोटा इतिहास सांगून ते लोकांच्या माथी मारत आहेत, असेही इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.