आयटी पार्कमधून 37 कंपन्या परराज्यात गेल्या, मिंधे सरकार मात्र हुजरेगिरीत व्यग्र! शिवसेनेची घणाघाती टीका

आधी राज्यात येऊ घातलेले नवीन उद्योग गुजरातला गेले होते. त्यात आता 37 आयटी कंपन्यांचीही भर पडली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या परराज्यात गेल्याचं वृत्त आहे. पण, या सगळ्यात घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे.

शिवसेनेच्या एक्सपोस्ट वरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एका वृत्तवाहिनीतील वृत्त दाखवण्यात येत आहे. त्या वृत्तानुसार, हिंजवडी आयटी पार्कमधून 37 आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. त्यावरून शिवसेनेने घणाघाती टीका केली आहे.

‘घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल 37 आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे.’ अशी टीका शिवसेनेने केली आहे.