राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगाली जिल्हा अव्वल ठरला आहे. हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला मराठवाड्यातून प्रथम गुणांकन तर राज्यात पाचव्या क्रमांकांचे गुणांकन मिळाले आहे. राज्यात नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण 13 टक्के एवढे आहे तर हिंगोली जिल्ह्यात हेच प्रमाण 5.9 टक्के एवढे आहे.
महाराष्ट्र आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे संचालक धीरजकुमार यांनी राज्यभरातील जिल्हानिहाय शासकीय आरोग्य यंत्रणांचे निदान केले. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखालील यंत्रणांचा स्वतंत्रपणे गुणानुक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयाने मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून, राज्यात हे रुग्णालय पाचव्या क्रमांकावर आहे.
नवजात शिशूंची विशेष काळजी
आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंगोली जिल्हा रुग्णालयात गरोदर मातांची तपासणी, लसीकरण, प्रसूती, प्रसूतीनंतर देण्यात येणारी सेवा, नवजात शिशूंना दिले जाणारे उपचार, नवजात शिशूंचा मृत्युदर कमी व्हावा, यासाठी चांगली सेवा देण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात केवळ हिंगोली जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी कृत्रिम श्वास यंत्रणा वापरल्या जात आहेत. महाराष्ट्रात नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण 13 टक्के आहे. त्या तुलनेत हिंगोली जिल्ह्याचे प्रमाण अत्यंत कमी 5.9 टक्के आहे.
शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले
जिल्हा रुग्णालयात यापूर्वी शस्त्रक्रिया कमी प्रमाणात होत असत. आता छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढले आहे. ओपीडी आणि आयपीडीची सेवा अद्ययावत करण्यात आली आहे. या सर्व विषयांची माहिती आयुक्तालयामार्फत घेतली जात आहे. घेण्यात आलेल्या सर्व माहितीचे प्रामाणिकरण झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना गुण दिले जातात. या गुणानुक्रमात हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयाने 43.33 गुण मिळवून मराठवाड्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर राज्यात पाचव्या स्थानी आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा रुग्णालयाने 45.59 गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे. वर्धा जिल्हा रुग्णालय 45.04 गुण घेऊन दुसरा, नगर जिल्हा रुग्णालय 44.53 गुण घेऊन तिसरा तर नाशिक जिल्हा रुग्णालय 43.95 चौथ्या स्थानावर आहे.
नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण कमी
हिंगोली जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूंसाठी कृत्रिम श्वास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सुविधा मराठवाड्यात केवळ हिंगोली जिल्हा रुग्णालयात सुरू आहे. महाराष्ट्रात नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण 13 टक्के आहे. त्या तुलनेत हिंगोली जिल्ह्याचे प्रमाण अत्यंत कमी 5.9 टक्के असल्याची माहिती बालरोग विभागप्रमुख डॉ. गोपाल कदम यांनी दिली.
सर्व रुग्णालय कर्मचार्यांचे यश
जिल्हा शासकीय रुग्णालयात येणार्या रुग्णांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी हे परिश्रम घेतात. रुग्णालयातील सुविधेचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे नेहमीच आढावा घेत असतात. सर्व कर्मचार्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे हिंगोली जिल्हा रुग्णालय मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.