महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल आज मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनीच अधिक गुण मिळवून बाजी मारली असून, छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी तनिषा बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत पैकीच्या पैकी गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. विभागाचा निकाल 94.08 टक्के लागला असून, लातूर विभागाचा निकाल 92.36 टक्के लागला आहे.
बारावीची परीक्षा फेबु्रवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांतून 1 लाख 74 हजार 51 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 63 हजार 762 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 94.08 इतकी आहे. अशी माहिती मंडळाच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी दिली. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, प्रियाराणी पाटील आदींची उपस्थिती होती.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांत बीड जिल्हा अव्वल असून, या जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 95.70 टक्के लागला आहे. दुसरा क्रमांक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा असून, येथे 94.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जालना आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्यांची निकालांची टक्केवारी 91.88 इतकी असून, परभणीचा निकाल 90.42 टक्के लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील 1 हजार 271 विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर-571, बीड-123, परभणी-284, जालना-246 आणि हिंगोली जिल्ह्यात 101 मुलांना लाभ झाला आहे. या संबंधीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकार्यांकडून प्राप्त झाले आहेत, असे डॉ. जामदार यांनी सांगितले. विभागात 703 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. परीक्षेतील गैरप्रकाराबाबत बोर्डाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. गैरप्रकाराच्या दाखल प्रकरणापैकी 151 जणांवर कार्यवाही करण्यात आली आहे.
लातूर विभागाचा 92.36 टक्के निकाल
लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 92.36 टक्के लागला असून, हा विभाग निकालात राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 89.96 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.30 टक्के आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली. लातूर विभागातून 50 हजार 369 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 45 हजार 313 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 89.96 टक्के राहिले तर 41 हजार 159 मुलींपैकी 39 हजार 228 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.30 टक्के राहिले. विज्ञान शाखेचा निकाल 97.81 टक्के, कला शाखेचा 84.10, वाणिज्य शाखेचा 92.31 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा 83.49, आयटीआयचा निकाल 84.70 टक्के लागला आहे.
सर्वाधिक निकाल लातूर जिल्ह्याचा
विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.39 टक्के लागला आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 89.78 टक्के, नांदेड जिल्ह्याचा निकाल 89.74 टक्के लागला आहे.
कॉपीप्रकरणी 29 जणांवर कार्यवाही
लातूर विभागात 29 प्रकरणे कॉपीची उघडकीस आलेली होती. या सर्व 29 जणांवर मंडळाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली असून, त्या विषयाची त्यांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.