पाकिस्तानातून बनावट नोटा आणणाऱ्याला जामीन नाहीच, हायकोर्टाने फेटाळली

खोट्या नोटा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायकच आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने जावेद शेख या आरोपीला जामीन नाकारला. पाकिस्तानातून दुबईमार्गे मुंबईत खोटय़ा नोटा आणल्याचा शेखवर आरोप आहे. विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. जामीनासाठी शेखने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अजय गडकरी व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठाने शेखला जामीन दिला नाही.
शेखची मागणी

दुबई किंवा मुंबई विमानतळावर शेखला अडवले नाही. विमानतळाबाहेर शेखला अटक केली. दोन हजार रुपयांच्या नोटा हिंदुस्थानात बंद आहेत. खोटय़ा गुन्ह्यात शेखला अडवण्यात आले आहे. याचे आरोपपत्र दाखल झाले. पण खटला कधी संपेल याची शाश्वती नाही. चार वर्षे शेख कारागृहात आहे. त्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी शेखकडून करण्यात आली.

एनआयएचा युक्तिवाद

दोन हजारांच्या बनावट नोटा हिंदुस्थानात वितरित केल्या जाणार होत्या. अर्थव्यवस्थेसाठी हे धोकादायक आहे. शेखला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील संदेश पाटील यांनी केला. या गुन्ह्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. शेखला जामीन देता येणार नाही. या खटल्याची सुनावणी जलदगतीने घ्यावी, अशी सूचना न्यायालयाने केली.

काय आहे प्रकरण…

शेखला 2020 मध्ये डीसीबी-सीआयडीने विमानतळाबाहेर अटक केली. दोन हजार रुपयांच्या खोटय़ा नोटा त्याच्या बॅगेत सापडल्या. हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला. अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी या नोटा देशात आणल्याचा आरोप शेखवर आहे.