रिक्षाला कारने ठोकणाऱया महिलेचा गुन्हा हायकोर्टाने केला रद्द

रिक्षाला कारने ठोकणाऱया महिलेचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. महिलेने 15 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

पलक हार्दिक जोशी असे या महिलेचे नाव आहे. जोशी यांनी कार चालवत असताना एका रिक्षाला धडक दिली. एमएचबी पोलिसांत जोशी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्याचे आरोपपत्र दाखल झाले. हा गुन्हा व आरोपपत्र रद्द करण्यासाठी जोशी यांनी याचिका केली होती. सुट्टीकालीन न्यायालयासमोर जोशी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्या. संदीप मारणे व न्या. डॉ. निला गोखले यांच्या खंडपीठाने वरील आदेश देत जोशी यांचा गुन्हा व आरोपपत्र रद्द केले.

काय आहे प्रकरण
16 सप्टेंबर 2018 रोजी ही घटना घडली. कार चालवत असताना जोशी यांनी विजयभान पाल यांच्या रिक्षाला धडक दिली. हा गुन्हा गैरसमजुतीतून नोंदवण्यात आला आहे, असा दावा जोशी यांनी केला होता. याला पाल यांनी विरोध केला नाही. मी आता उतर प्रदेश येथे वास्तव्यास आहे. हा गुन्हा रद्द करण्यास माझी काहीच हरकत नाही, असे पाल यांनी न्यायालयाला सांगितले.