हायकोर्टाने मंजूर केली तिसऱया बाळंतपणाची रजा; दुसऱया विवाहामुळे नियमाचे उल्लंघन होत नसल्याचा निर्वाळा

तिसऱया बाळंतपणाची रजा मंजूर करत उच्च न्यायालयाने एका महिलेला दिलासा दिला आहे. या महिलेचा दुसरा विवाह झाला आहे. त्यानंतर तिला तिसरे मूल झाले. या प्रकरणात रजेचा लाभ देताना कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.

विमान प्राधिकरणाच्या कर्तव्यात असलेल्या महिलेने व कर्मचारी संघटनेने रजेचा लाभ मिळावा म्हणून याचिका केली होती. न्या. अतुल चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर केली. या महिलेला आठ आठवडय़ांत रजेचा लाभ द्या, असे आदेश न्यायालयाने विमान प्रशासनाला दिले आहेत.

 

महिलेचा दावा

विमान प्राधिकरणाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर मला दोन मुले झाली. दोन्ही मुले दुसऱया विवाहानंतर झाली आहेत. सेवा नियमानुसार मी रजेसाठी पात्र आहे. तरीही माझा रजेचा अर्ज प्राधिकरणाने नाकारला. हे अयोग्य आहे, असा दावा महिलेने केला.

निर्बंध लोकसंख्या नियंत्रणासाठी नाहीत

दोन वेळाच बाळंतपणाची रजा मिळेल हा नियम लोकसंख्या नियंत्रणासाठी नाही. याचिकाकर्त्या महिलेचा दुसरा विवाह झाला आहे. या प्रकरणात रजा मंजूर करताना नियमाचा अडथळा येत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

प्राधिकरणाचा युक्तिवाद

सेवा नियमानुसार किती मुले आहेत हे बाळंतपणाची रजा देण्याआधी तपासले जाते. अर्जदार महिलेचे हे तिसरे बाळंतपण आहे. ती रजेसाठी पात्र ठरत नाही. कारण बाळंतपणाची रजा दोन मुलांसाठी मिळते. परिणामी तिला रजा नाकारण्यात आली, असा युक्तिवाद प्राधिकरणाने केला.

महिलेच्या वेदनांचा विचार व्हावा

सेवेत असणाऱया महिलेला गरोदरपणात अनेक वेदना होत असतात. बाळाला जन्म दिल्यानंतरही तिच्यासमोर अनेक आव्हाने असतात. बाळंतपणाची रजा मंजूर करताना महिलेला अनुपंपा दाखवणे गरजेचे आहे. आई होणे नैसर्गिक क्रिया आहे. गरोदरपणात महिलेला आवश्यक त्या सर्व गोष्टी द्यायला हव्यात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण

पुणे येथील या महिलेचा पहिला विवाह 1997 मध्ये झाला. तिचा पती विमान प्राधिकरणात कामाला होता. त्यावेळी तिला बाळ झालं. त्यानंतर पतीचे निधन झाले. पतीच्या जागेवर तिला 2004 मध्ये अनुपंपा नोकरी मिळाली. 2008 मध्ये तिने दुसरा विवाह केला. 2009 मध्ये तिला दुसरं अपत्य झालं. 2012 मध्ये तिसरं मूल झालं. तिसऱया बाळंतपणाच्या रजेसाठी महिलेने अर्ज केला. तिसऱया बाळंतपणाला रजा दिली जात नाही, असे सांगत या महिलेचा अर्ज नाकारण्यात आला. त्याविरोधात ही याचिका करण्यात आली होती.