वडिलांचे पैसे मुलीला शिक्षणासाठी मिळणारच, एक कोटी देण्याचे आईला आदेश

वडिलांनी शिक्षणासाठी ठेवलेले पैसे मुलीला न देणाऱ्या आईला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. या पैशांचे सर्वाधिकार मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने आईला दिले आहेत. त्यामुळे मुलीला शिक्षणासाठी तब्बल एक कोटी रुपये मिळणार आहेत.

न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. फिरदोस पुन्नीवाला यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. आमच्या आदेशाचे पालन झाले नाही तर आईवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल. तसेच मुलीला एक कोटी 8 लाख 74 हजार 318 रुपये बँकेतून काढण्याची मुभा दिली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावरील पुढील सुनावणी 25 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.

मुलीचा दावा

वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी पैसे ठेवले आहेत. या पैशांची कस्टोडियन आई आहे. मला अमेरिकेतील कोलोंबो विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. तेथे फी भरायची आहे व अन्य शैक्षणिक खर्च आहेत. त्यासाठी हे पैसे देण्याचे आदेश न्यायालयाने आईला द्यावेत, असा दावा मुलीकडून करण्यात आला.