दाताचे डॉक्टर करतात हेअर ट्रान्सप्लांट, हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

दाताचे डॉक्टर हेअर ट्रान्सप्लांट करत असल्याचा धक्कादायक आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकारसह अन्य प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे.

द डायनामिक डरमोटॉलॉजी अॅण्ड हेअर ट्रान्सप्लांट असोसिएशनने ही याचिका केली आहे. हेअर ट्रान्सप्लांटचा कोणताही अनुभव आणि प्रशिक्षण घेतलेले नसताना दाताचे डाक्टर ही प्रक्रिया करत आहेत. ही फसवणूक असून दाताच्या डाक्टरांना हेअर ट्रान्सप्लांट करण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने केंद्र सरकारसह अन्य प्रतिवादींना नोटीस जारी करत सुनावणी चार आठवडय़ांसाठी तहकूब केली.

हे ठरू शकते धोकादायक

हेअर ट्रान्सप्लांटसाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षण न घेता हेअर ट्रान्सप्लांट केल्यास ते धोकादायक ठरू शकते. तशा तक्रारी असोसिएशनकडे नोंदवल्या गेल्या आहेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.