हायकोर्टाची ईओडब्ल्यूच्या आरोपींना चपराक, गुन्हा रद्द करण्यासाठी ठोठावला पाच लाखांचा दंड

आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवलेल्या चार आरोपींना व तक्रारदाराला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपी व तक्रारदाराला प्रत्येकी एक लाख रुपये दंड न्यायालयाने ठोठावला.

आरीफ अब्दुल रजाक चुनावाला, फारुख चुनावाला, अब्दुल चुनावाला व समीर चुनावाला यांनी ही याचिका केली होती. अहमद मोतीवाला यांनी यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली होती. चुनावाला यांनी गुंतवणुकीचे अमिष दाखवून फसवणूक केली, असा मोतीवालांचा आरोप होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने 18 ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत केली होती. न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

तक्रारदार व आरोपी प्रत्येकी एक लाख रुपये देण्यास तयार आहेत. पण गुन्हा रद्द करावा, अशी विनंती न्यायालयाला केली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्यास मान्यता दिली. दंडाची रक्कम न भरल्यास खटला चालवला जाईल, असा सज्जड दमही खंडपीठाने दिला. दंडाची एकूण पाच लाखांची रक्कम लष्कर कल्याण निधीला मिळणार आहे.