‘लाडक्या बहिणी’ला विरोध करणाऱ्याला धमकी, हायकोर्टाने पोलिसांना दिले सुरक्षा देण्याचे आदेश

लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडापल्लीवार यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली. याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना वडापल्लीवार यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले.

न्या. विनय जोशी व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. याचिका दाखल केल्यानंतर मला धमक्या मिळत आहेत. माझ्या जीविताला धोका होऊ शकतो. मला पोलीस सुरक्षा द्यावी, अशी विनंती वडापल्लीवार यांनी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्य केली. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही पोलिसांची जबाबदारी आहे. वडापल्लीवार यांना सुरक्षा देण्याबाबत नागपूर पोलीस आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा, असेही खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे.

तिजोरीवर ताण येतोय

मिंधे सरकारने जाहीर केलेल्या योजनांवर वडापल्लीवार यांनी याचिकेत आक्षेप घेतला आहे. लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येत आहे. राज्याच्या तिजोरीवर ताण वाढतो आहे. या फुकटच्या योजना बंद कराव्यात, अशी मागणी वडापल्लीवार यांनी याचिकेत केली आहे.