मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमवायला पॅरोल का नाही? हायकोर्टाचे परखड मत, कैद्याला मंजूर केला दहा दिवसांची रजा

अंत्यसंस्कार, विवाह व अन्य कारणांसाठी पॅरोलची रजा दिली जाते. मग मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमवायला किंवा परदेशी शिक्षणासाठी जाणाऱया मुलाला निरोप देण्यासाठी पॅरोल का दिला जात नाही, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने एका कैद्याला दहा दिवसांची विशेष रजा मंजूर केली.

विवेक श्रीवास्तव असे या कैद्याचे नाव आहे. त्याचा मुलगा ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी जाणार आहे. त्यासाठी पॅरोल द्यावा, अशी विनंती त्याने कारागृह प्रशासनाकडे केली होती. कारागृह प्रशासनाने त्यास नकार दिला. श्रीवास्तवने याचिका दाखल केली. न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने श्रीवास्तवला दहा दिवसांची (12 ते 22 जुलै 2024) विशेष पॅरोलची रजा मंजूर केली. या काळात त्याने उत्तर प्रदेश येथील पोलीस ठाण्यात दररोज हजेरी लावावी. 25 हजार रुपयांची हमी जमा करावी. पॅरोलची रजा संपल्यानंतर लगेचच तुरुंगात जावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

काय आहे प्रकरण

हत्येप्रकरणी सिल्वासा सत्र न्यायालयाने श्रीवास्तवला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याच्या मुलाची निवड झाली आहे. दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. त्याचे शुल्क तब्बल 35 लाख रुपये आहे. तेथे राहण्याचा व प्रवास खर्चही करायचा आहे. हा अभ्यासक्रम 22 जुलै 2024 पासून सुरू होत आहे. मुलाच्या शिक्षणासाठी श्रीवास्तवला पैसे जमवायचे आहेत. त्याला 30 दिवसांची पॅरोल रजा हवी होती. ही रजा देण्यास प्रशासनाने नकार दिला.

n श्रीवास्तवचा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. वडील म्हणून हा त्याच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. हा क्षण त्याच्यापासून हिरावून घेतला जाऊ शकत नाही. अशा गोष्टींसाठी नियमांत तरतूद का नाही, असे न्यायालयाने नमूद केले.