कारागृहात असल्याने शिक्षण नाकारता येणार नाही, हायकोर्टाचा निर्वाळा; कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी घेणार कायद्याचे धडे

आरोपी कारागृहात आहे म्हणून त्याला शिक्षण नाकारता येणार नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपीला एलएलबी प्रवेशासाठी परवानगी दिली.

महेश राऊत असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तो सध्या तळोजा कारागृहात आहे. सिद्धार्थ महाविद्यालयात त्याला एलएलबीसाठी प्रवेश मिळाला आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्याला स्वतः कॉलेजमध्ये हजर राहावे लागते. विद्यार्थी स्वतः हजर न राहिल्यास प्रवेश रद्द केला जातो. त्यामुळे राऊतने याचिका केली होती.

न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने राऊतच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. तळोजा कारागृहात जाऊन राऊतची कागदपत्रांवर स्वाक्षरी घेता येईल. राऊतच्या नातेवाईकाला ही कागदपत्रे सादर करण्याची मुभा कॉलेजकडून दिली जाऊ शकते, असे न्यायालयाने नमूद केले.