मुंबईतील चालीरीतीप्रमाणे जरा वागा; हायकोर्टाचा दंडाधिकाऱ्यांना सल्ला, वकिलांच्या वर्तनावर भाष्य करू नका

मुंबईत बदली झाल्यानंतर येथील चालीरितींप्रमाणे दंडाधिकारी यांनी वागायला हवे. वकिलांच्या वर्तनावर भाष्य करू नये, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुलुंडमधील एका दंडाधिकाऱ्यांवर महिला वकिलाने आरोप केला. संबंधित दंडाधिकारी वकिलांच्या वर्तनावर भाष्य करत असतात. अॅड. श्रृती मुंदरगी यांच्या वागणुकीवर त्यांनी टिप्पणी केली, असे अॅड. स्वप्ना कोदे यांनी न्या. एस. एम. मोडक यांच्या निदर्शनास आणले. त्यावर न्या. मोडक यांनी दंडाधिकारी यांची चांगलीच कानउघडणी केली.

मुंबईतील व मुंबईबाहेरील परिस्थिती एकसारखी नसते. आपण त्याची तुलनाही करू शकत नाही. कारण मुंबईतील व या शहराबाहेरील प्रथा वेगवेगळ्या आहेत. त्या दंडाधिकारी यांनी समजून घ्यायला हव्यात, असे न्या. मोडक यांनी नमूद केले. न्यायाधीशांनी तडजोड करण्याचा सल्ला दिला तर त्यात काही चूक नसते. ते पक्षकारांच्या हिताचेच असते. असा सल्ला दिला म्हणून न्यायाधीशांवर पक्षपातीपणाचा आरोप करता येणार नाही, असे न्या. मोडक यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण

एका महिलेने घटस्पह्टासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला आहे. तसेच मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे. ही तक्रार वांद्रे कुटुंब न्यायालयात वर्ग करावी, अशी विनंती करणारा अर्ज या महिलेने उच्च न्यायालयात केला होता. काwटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीची सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याचे नमूद करत न्या. मोडक यांनी ही विनंती मान्य केली नाही.