हिजबुल्लाहने मोसादच्या मुख्यालयाला केले लक्ष्य, डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्ध आता भीषण रूप घेत आहे. इस्त्रायलच्या एकापाठोपाठ एक हल्ल्यात लेबनॉनमध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर हिजबुल्लाह हादरले आहे. आणि मागे हटायला तयार नाही. आता हिजबुल्लाहने बुधवारी तेल अवीव जवळील मोसादच्या कार्यालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे.

नुकत्याच झालेल्या हल्ल्यांची योजना मोसादच्या मुख्यालयात आखण्यात आल्याचे या गटाने म्हटले आहे. जवळपास वर्षभर चाललेल्या युद्धानंतर हिजबुल्लाहने पहिल्यांदाच बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा केला आहे. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की, हिजबुल्लाहने डागलेले क्षेपणास्त्र आयर्न डोमने रोखण्यापूर्वी प्रथमच राजधानी तेल अवीवमध्ये पोहोचले.

हिजबुल्लाहने बुधवारी नकत्याच एका वक्तव्यात सांगितले की, बुधवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता तेल अवीवच्या बाहेरच्या परिसरातील मोसादच्या मुख्यालयावर निशाणा साधला आहे. त्यांनी कादर बॅलेस्टिक मिसाइल डागली आहे. मागच्या आठवड्यात लेबनॉनमध्ये झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत निवेदनात म्हटले आहे की, नेत्यांची हत्या आणि पेजर-वायरलेस उपकरणांद्वारे स्फोटासाठी मोसाद जबाबदार आहे. यामध्ये हेही सांगण्यात आले आहे की, हा हल्ला गाझाच्या लोकांचे समर्थन, लेबनॉन आणि त्यांच्या लोकांच्या रक्षणासाठी केल्याचे म्हटले आहे.

सैन्य विश्लेषक रियाज काहवाजी यांनी सांगितले की, हिजबुल्लाहने इस्त्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची ही पहिलीच वेळ आहे. ही क्षेपणास्त्रे इराणमध्ये बनलेली आहेत. इस्त्रायलने गाझावरून लक्ष हटवून लेबनॉनवर मोठी कारवाई सुरू केली आहे. लेबनॉनी आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, इस्त्रायलच्या हल्ल्यात सोमवारी 558 जण ठार झाले.