युद्ध आणखी चिघळले, हिजबुल्लाहने इस्रायलमध्ये डागली 100 रॉकेट्स

इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये सुरू असलेले युद्ध आणखी चिघळले आहे. लेबनॉनमध्ये पेजर, सौर उपकरणांचे स्पह्ट झाल्यानंतर हिजबुल्लाह आणखी आक्रमक झाली आणि इस्रायलच्या विविध भागांवर हल्ले सुरू केले. आज हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये तब्बल 100 रॉकेट्स डागली. हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये धोक्याचा सायरन वाजला. रॉकेट, क्षेपणास्त्रs आणि ड्रोन डागल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर लोकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला, लाखो नागरिक जीव मुठीत घेऊन शेल्टरमध्ये लपले.

हिजबुल्लाहने रॉकेट हल्ला केल्यानंतर इस्रायलमध्ये अनेक लष्करी तळांजवळ अलर्ट जारी करण्यात आला. इस्रायलच्या सैन्यदलाने ‘एक्स’वर या हल्ल्याबाबतची माहिती दिली. हिजबुल्लाहचे दहशतवादी सातत्याने इस्रायली नागरिकांना लक्ष्य करत असून सातत्याने रॉकेटचा वर्षाव होत आहे. याआधी हिजबुल्लाह लष्करी तळांना टार्गेट करत होता, परंतु वर्दळ असलेल्या भागात हल्ले केले जात आहेत, असा आरोप इस्रायलने केला आहे.

इस्रायलशी आता थेट लढाई हिजबुल्लाह उपप्रमुख

इस्रायलशी आता थेट लढाई सुरू झाल्याचे हिजबुल्लाहचे उपप्रमुख नईम कासम यांनी म्हटले आहे. उत्तर इस्रायलमध्ये जोरदार हल्ले केल्यामुळे तेथील लोकांना दुसरीकडे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. हिजबुल्लाचे कमांडर इब्राहिम अकील यांच्यावर अंतिम संस्कार करताना आपल्याला प्रचंड वेदना होत असल्याचे ते म्हणाले. आपण मानव आहोत त्यामुळे आम्हाला ज्या वेदना होत आहेत तशाच वेदना तुम्हालाही देणार, असा इशाराही त्यांनी इस्रायलला दिला आहे. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.