हिजबुल्लाहचा इस्रायलवर हल्ला; रॉकेट हल्ल्यात अनेक मुलांसह 12 ठार, 30 जखमी

लेबेनॉनमधून इस्रायलवर सातत्याने हल्ले करणाऱ्या हिजबुल्लाह बंडखोरांनी शनिवारी इस्रायलच्या गोलान हाईट्समधील फुटबॉल मैदानावर केलेल्या हवाई हल्ल्यात 12 जण ठार झाले असून, मृतांमध्ये बहुतेकजण मुले आहेत. या हल्ल्यात 30 जण जखमी झाले आहेत.

गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांशी संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायलवर हिजबुल्लाहच्या बंडखोरांनीही हल्ले सुरू केले होते. त्यांनी गेल्या दहा महिन्यांत केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायल चवताळले असून परराष्ट्र मंत्री इस्रायल पॅट्झ यांनी युद्धाची ठिणगी कधीही पडू शकते, असा इशारा दिला आहे.

लेबेनॉनमधून डागले रॉकेट

हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेने शनिवारी गोलान हाइट्सच्या फुटबॉल मैदानावर लेबेनॉनमधून रॉकेट डागले होते. या वेळी मैदानात अनेक शालेय मुले, युवक क्रीडा सराव करत होती. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, मृतांमध्ये बहुतेक 10 ते 20 वर्षे वयोगटातील मुले आहेत. हवाई हल्ल्यानंतर मैदानातील जमिनीवर विखुरलेल्या मुलांच्या सायकली आणि रक्ताची थारोळी असे विदारक दृश्य दिसत होते.

नेतान्याहू तातडीने परतले

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू या हल्ल्याची माहिती मिळताच तातडीने मायदेशी परतले. आधी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या हिजबुल्लाहने काही वेळाने आपले म्हणणे मागे घेतले. हा हल्ला फलाक-1 रॉकेटच्या सहाय्याने करण्यात आला आहे, ज्याचा वापर फक्त हिजबुल्लाहकडून केला जातो, असे इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे.

युद्धाची तयारी

या हल्ल्यामुळे हिजबुल्लाहने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याचे जशास तसे उत्तर आम्ही नक्कीच देऊ. हिजबुल्लाहबरोबर आमचे युद्ध कधीही सुरू होऊ शकते, असे परराष्ट्र मंत्री इस्रायल पॅट्स यांनी सांगितले. हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर दोघांमधील थेट संघर्षाचा धोका वाढला आहे. आम्ही लेबेनॉनला बेचिराख करून अश्मयुगात पाठवू शकतो, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सांगितले.