पाऊस ‘धबधबावन’ पडतोय! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले; आजही मुक्काम, जोरदार बरसणार

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून आजही मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तर सिंधुदुर्ग- कोकणात अक्षरशः ‘धबधबावन’ पाऊस झाला. मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या, तर रस्ते वाहतूक कोलमडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. वडाळा ब्रीजवर पाणी तुंबल्याने वाहतूक खोळंबली. तळकोकणसह राज्याच्या अनेक भागांत शेती पाण्याखाली गेली. महाडमध्ये नदीत एक तरुण आणि एक वृद्ध वाहून गेले.  खेड-दापोली मार्ग 20 तास बंद होता.  कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई-महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबई, पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सातारा येथील घाटांवर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शिवाय वसई, पालघर, ठाणे, घाटकोपर, पवई, कुर्ला, महाड, खेड आणि चिपळूण, कुडाळ, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात जोरदार पावसामुळे एनडीआरएफच्या टीम तैनात ठेवण्यात आल्या होत्या. वैभववाडीत कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प आणि वीज पुरवठाही खंडित होता. पावसाचा इशारा पाहता मुंबईत तीन पथके आणि एक पथक नागपूरमध्ये तैनात ठेवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिल्याने काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्ये 11 बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिह्यातील 11 धरण क्षेत्रांत कोसळत असलेल्या पावसामुळे जिह्यातील 78 बंधारे पाण्याखाली गेले असून जिह्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. राजाराम बंधाऱ्यावर दुपारी एक वाजता पंचगंगेची पाणी पातळी 39 फूट 1 इंच इतकी नोंदली गेली तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने राधानगरी धरण 82 टक्के, काळम्मावाडी 61.55 तर वारणा धरण 77.94 टक्के भरले.

सातारा, महाबळेश्वर व परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे लिंगमळा धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने या भागात पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे.

पश्चिम, उत्तर महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याकडून पश्चिम, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच आसपासच्या जिह्यांमध्येदेखील जोरदार पावसाची शक्यता असून मराठवाडय़ातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आणखी तीन दिवस मुसळधार

मुंबईसह कोकणात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे. शिवाय महाराष्ट्राच्या अनेक भागांत जोरदार पाऊस होणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे के.एस. होशाळीकर यांनी सांगितले.

मुंबईत असा झाला पाऊस

  • मुंबई शहर        135 मि.मी.
  • पश्चिम उपनगर         137 मि.मी.
  • पूर्व उपनगर      154 मि.मी.