मुंबईत वादळाची धुळवड!ताशी 60 किमी वेगाने वारे आणि अवकाळी पाऊस

उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबई-ठाणेकरांना आज धुळीचे भयंकर वादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिला. नवी मुंबईसह महानगराच्या विविध भागांत वादळी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत 4 वाजताच्या सुमारास अचानक 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने धुळीच्या लोटांसह सोसाटय़ाचा वारा वाहू लागल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. भरदुपारी अंधार झाला. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. मेट्रो, मध्य रेल्वे कोलमडली, तर पश्चिम रेल्वे मार्गालाही वादळी पावसाचा फटका बसला. 15 विमाने अन्यत्र वळवावी लागली. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 8 ठार तर 70 जण जखमी झाले, तर वडाळय़ात मेटल पार्पिंग कोसळल्याने एक जण जखमी झाला.

मुंबईत सकाळपासून कडाक्याचे ऊन पसरले होते. असे असतानाच अचानक ठाण्यापासून सोसाटय़ाच्या वाऱयासह जोरदार पाऊस सुरू झाला. मुंबईतही वादळी वाऱयासह पाऊस सुरू झाल्याने कामावरून घरी जाणाऱया चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. यातच रेल्वे सेवाही कोलमडल्याने सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. दादरसह, वांद्रे, गोरेगाव, बोरिवली, दहिसर, कांदिवली, गोरेगाव, कुर्ला, भांडुप, विक्रोळी, विद्याविहार, शीव आदी ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. जोराच्या वाऱयामुळे कुर्ल्यात काही घरांचे पत्रे उडाले, तर अनेक ठिकाणी झाडे-झाडाच्या फांद्या कोसळल्या. ठाणे-मुलुंड दरम्यान रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायरवर पोल कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली, तर मेट्रोलाही पावसाचा फटका बसला.

अनेक भागांत वीज गायब

जोरदार वाऱयामुळे मुंबईच्या अनेक भागांत वीज गायब झाली. यामुळे अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झाले. तर लिफ्ट बंद पडल्याने काही जण लिफ्टमध्ये अडकून पडले. शिवाय वीज गायब झाल्याने ऐन काम संपवण्याच्या वेळी अनेकांचा कामाचा खोळंबा झाला.

कुर्ला, भांडुप, विक्रोळीतील पाणीपुरवठा विस्कळीत

वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे आज संध्याकाळी 5 वाजता पवई येथील 22 केव्ही विद्युत उपपेंद्राचे नुकसान झाले आहे. पवई उदंचन पेंद्राला होणारा विद्युत पुरवठादेखील खंडित झाला. त्यामुळे महापालिकेच्या कुर्ला आणि भांडुप विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

187 झाडे कोसळली; 5 जखमी, एकाचा मृत्यू

वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या 187 घटना घडल्या. या घटनांमध्ये पाच जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. वांद्रे येथील हिल रोडवर उंबराची फांदी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अब्दुल खान हे जखमी झाले तर इरफान खान याचा मृत्यू झाला. मुंबई शहर 16, पूर्व उपनगरात 104 आणि पश्चिम उपनगरात 67 झाड व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या 187 घटना घडल्या.

पुढचे दोन दिवस मुंबईत हलक्या सरी

मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पाऊस झाला. याबाबत अलर्टही देण्यात आला होता. ही स्थिती काही तासांपुरतीच निर्माण झाली होती. यानंतर सर्व ठिकाणी स्थिती पूर्ववत झाली, असे आयएमडी मुंबईच्या सुषमा नायर यांनी सांगितले. तर पुढचे दोन दिवस मुंबईत हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाच्या वैज्ञानिक अनुपम कश्यपि यांनी व्यक्त केला.

माथेरानमध्ये गारपीट

माथेरानमध्ये आज गारपीट झाली. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांची एकच तारांबळ उडाली. काही ठिकाणी पर्यटकांनी भरपावसात रस्त्यावर उतरून गारा जमा करण्याचा आनंदही लुटला. नेरळ-कळंब मार्गावर मानिवली गावानजीक झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

n दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर धुळीचे प्रचंड वादळच आले. याची तीव्रता इतकी भयंकर होती की, काही अंतरावरची माणसेही दिसत नव्हती. अचानक आलेल्या धुळीच्या वादळामुळे या ठिकाणी खेळायला आलेली मुले, मुंबईकर आणि रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. दादर, माहीम, गिरगाव या चौपाटय़ांवरही धुळीचे लोट उठले होते.

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 8 जण ठार, 70 जखमी

वादळाच्या तडाख्याने घाटकोपरमध्ये रेल्वेच्या हद्दीत असलेले महाकाय हार्ंडग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर 70 जण जखमी झाले. पावसामुळे हे सर्वजण आडोशासाठी थांबले होते तेव्हाच ही दुर्घटना घडली. याप्रकरणी होर्डिंग पंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद अक्रम (48), दिनेश जैसवाल, चंद्रमणी प्रजापती आणि भरत राठोड या चार जणांचा मृत्यू झाला. राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात झालेल्या 66 जणांपैकी 31 जणांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले आहे तर जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये 3 वर, विक्रोळीतील फुले रुग्णालयात 4 जणांवर तर कळवा येथील प्रकृती रुग्णालयात एकावर उपचार सुरू आहेत. 114

हा कंपनीचे मालकाविरोधात गुन्हा दाखल

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी रात्री उशिरा पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंपनीचे मालक भावेश भिंडे यांच्या विरोधात भादंवि कलम 304,338,337,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पंतनगर पोलीस करत आहेत.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

घाटकोपर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱयांवर कारवाई करण्यात येईल. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

बेकायदेशीर हार्ंडगने घात केला

घाटकोपर छेडानगर येथे कोसळलेले 120 बाय 120 फुटांचे हार्ंडग रेल्वे हद्दीत बेकायदेशीररीत्या उभे होते. या ठिकाणी नियमानुसार 40 बाय 40 फुटांचे होर्डिंग उभारण्याची परवानगी संबंधित पंपनीला पालिकेने दिली होती. मात्र याकडे संबंधित इगो मीडिया कंपनीने दुर्लक्ष करीत 22 एप्रिलपासून होर्डिंगसाठी बेकायदा बांधकाम सुरू केले होते. याबाबत आलेल्या तक्रारींनंतर पालिकेने लोहमार्ग आयुक्तालयाकडे तक्रारही दाखल केली होती. शिवाय संबंधित पंपनीने होर्डिंग दिसण्यासाठी आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केला होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिकेने मे महिन्यात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती.

होर्डिंग कोसळण्याच्या घटना वारंवार घडूनही सरकार ढिम्मच

पुण्यात वारंवार हार्ंडग कोसळण्याच्या दुर्घटना घडूनही राज्य सरकारला अद्याप जाग आलेली नाही. आता घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना आणि बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत; पण आतापर्यंत राज्यात एकाही होर्डिंग पंपनीच्या विरोधात कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात येते.

एप्रिल महिन्यात मुंबई-पुणे महामार्गालगत पिंपरी-चिंचवडमधील किवळे (रावेत) येथे सोसाटय़ाच्या वाऱयामुळे हार्ंडग कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला होता. मुंबईप्रमाणेच पिंपरी- चिंचवडमध्ये अचानक पावसाने हजेर लावली आणि त्यात होर्डिंग कोसळले. तर पुण्यात हिंजवडीतील आयटी पार्क लक्ष्मी चौकात मे महिन्यात महाकाय होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनांनंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती फलक हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. एप्रिल महिन्यातच वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरात होर्डिंग कोसळले आहे. मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. पण जाणकारांच्या मते अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात सरकारने कोणताही कारवाई केली नाही.

वडाळय़ात मेटल पार्किंग कोसळले

वडाळा पूर्व बरकत अली नाका येथे प्रचंड मोठे मेटल पार्पिंग कोसळल्याने एकच घबराट उडाली. हे पार्पिंग दहा वाहनांवर कोसळले. या दुर्घटनेत एका कारमध्ये एक व्यक्ती अडकून जखमी झाल्याची घटना घडली.

प्रचार थांबवून अनिल देसाई मदतीला धावले

श्रीजी टॉवर बरकत अली नाका येथे मेटल पाकि&ंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी प्रचार थांबवून घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत अनेक गाडय़ा दबल्या होत्या. त्यात एक जण जखमी झाला. देसाई यांनी दुर्घटनाग्रस्तांना धीर देतानाच मदत व बचावकार्यासाठी यंत्रणांशी संपर्क साधला.