देवगड तालुक्यात शनिवारी सकाळपासून पावसाने सुरूवात केली असून पहिल्याच पावसाचा फटका मोंड गावाला बसला आहे. मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे 200 मीटरचा रस्ता शनिवारी दुपारी 3.30 वा. च्या सुमारास तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः वाहून गेला. या रस्त्याचे नूतनीकरण दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते. या घाटीरस्त्याच्या बाजूला चार ते पाच फूटाचा चर पडून तेथील माती पाण्याच्या बदलेल्या प्रवाहाने नजीकच्या घरांमध्ये घुसली. जलजीवनच्या पाईपलाईनच्या अर्धवट कामामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप तेथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील मोंड कॉलेज ते गावठणकडे जाणारा सुमारे दीड किलोमीटर डांबरी रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. या घाटीरस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः पाण्यात वाहून गेले आहे. या रस्त्यानजीक जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी गटारे खोदण्यात आली होती. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या गटारात पावसाचे पाणी अडून घाटीरस्ता उखडून गेला आहे. रस्त्यानजीक चार ते पाच फूटाचे चर पडले असून नजीकच्या वाडीत या चराची माती पाण्याच्या बदलेल्या प्रवाहाने वाहून जात तेथील घरांच्या मागील बाजूने घरात घुसली आहे. यात सुमारे पाच ते सहा घरे बाधित झाली आहेत. वाडीकडे जाणारा हा घाटीरस्ता शेतकऱ्यांची कायमस्वरुपी ये – जा करण्यासाठीची मार्ग असून घाटीच्या वाहून गेलेल्या मातीमुळे या घाटीरस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे. या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला स्थानिक नागरिकांनी दिली आहे.