उत्तरेत पावसाचा कहर सुरूच, दिल्लीत हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हरयाणा, जम्मू आणि कश्मीर, राजस्थान येथे पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी आलेला महापूर, भूस्खलन, कोसळणाऱ्या दरडी, अपघात अशा विविध घटनांमध्ये तब्बल 72 जणांचा बळी गेला. एकटय़ा हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासांत तब्बल 39 ठिकाणी भूस्खलन झाले तर बियास नदीने रौद्ररुप धारण केल्याने इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या, गाडय़ा वाहून गेल्या.

उत्तर प्रदेशात 34, हिमालचलमध्ये 20, जम्मू आणि कश्मीरमध्ये 15, दिल्लीत 5 तर राज्यस्थान आणि हरयाणात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उत्तराखंड येथील उत्तरकाशी येथे पर्यटकांच्या गाडय़ांवर दगड कोसळ्यामुळे इंदूरच्या चार पर्यटकांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले.

दिल्लीत हजारो नागरिकांना हलविले

दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याची पातळी 206.32 मीटरवर पोहोचली. याआधी 1978मध्ये नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने नदीकाठच्या शहरांतील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले तसेच अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली. शहादरा जिह्यात विविध ठिकाणी 2,700 तात्पुरत्या निवारा छावण्या उभारण्यात आल्याची माहिती आपचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली.

हिमाचलमध्ये 800 पर्यटक अडकून पडले

हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी तब्बल 800 पर्यटक अडकून पडले असून त्यांना वाचविण्यासाठी पाठविण्यात आलेले हॅलीकॉप्टर खराब हवामानामुळे पुन्हा माघारी बोलावण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक सतवंत अटवाल यांनी दिली. या पर्यटकांची सुटका करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, चंद्रताल येथील बेस कॅम्पमध्ये समुद्र सपाटीपासून तब्बल 14 हजार 100 फुटांवर 300 पर्यटक अडकले असून या ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी सातत्याने सुरू आहे. त्यामुळे हिंदुस्थानी नौदलाचे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही, अशी माहिती महसूल विभागाचे मुख्य सचिव ओंकार चंद शर्मा यांनी दिली.

  • पंजाबमध्ये अंबाला लुधियाना राष्ट्रीय महामार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती अंबालाच्या उपायुक्त शालीन यांनी सांगितले.
  • अंबाला-शहारनपूर रेल्वे मार्गही बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात घस्तीपूर गावाजवळ अंबाला येथे रेल्वे ट्रक वाहून गेला.
  • गुरुकुल येथे अडकून पडलेल्या 750 विद्यार्थिनींची एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.
  • राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि ओदिशाला पुढील 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.