आमदार अपात्रतेची सुनावणी बुधवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी येत्या बुधवारी, 18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मिंधे गटाच्या आमदारांना पात्र करणारा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. याविरोधात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांच्यामार्फत स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल झाली आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या याचिकेवर 21 ऑक्टोबर 2024 रोजी सुनावणी होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. या पाहुणचारामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर समाज माध्यमातून टीका झाली. पंतप्रधानच सरन्यायाधीशांच्या घरी जात असतील तर न्यायाची अपेक्षा कशी करावी, असा सवालही उपस्थित झाला. तारीख पे तारीखमध्ये अडकलेल्या आमदार अपात्रतेचा योग्य निवाडा होईल का, असेही प्रश्न विचारले गेले. अखेर अचानक आमदार अपात्रतेच्या सुनावणीची पुढील तारीख 18 सप्टेंबर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर झळकले.