शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कायद्याच्या कचाटय़ात सापडला आहे. नार्वेकर यांनी 10 जानेवारीला दिलेला निकाल हा सर्वेच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे त्यास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने याचिका दाखल करत केली आहे. त्यावर सोमवार 22 जानेवारीला सर्वेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाचा निकाल देताना सर्वेच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. यासंदर्भात निकाल देताना अध्यक्ष नार्वेकर यांनी कुणालाच अपात्र ठरवले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेस अधिकृत म्हणून मान्यात दिली. तसेच सर्वेच्च न्यायालयाने शिवसेना गटनेते म्हणून अजय चौधरी आणि पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांची नियुक्ती वैध ठरवलेली नियुक्ती अवैध ठरवत गटनेते म्हणून शिंदे व प्रतोद म्हणून गोगावले यांच्या नियुक्तीस मान्यता दिली. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अॅड. रोहीत शर्मा यांनी 15 जानेवारीला सर्वेच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका न्यायालयाने स्विकारली असून सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
z विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवार 19 जानेवारी, शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता होती. याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य झाली असून सोमवारी 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
z महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटल्यात सर्वेच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्यात निकाल देताना कोणत्या मुद्दय़ावर अपात्रतेवर निर्णय घ्यावा याच्या मार्गदर्शक सूचना ठरवून दिल्या होत्या. पण सर्वेच्च न्यायालयाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल दिला. याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
मिंधे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला सुनावणी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निकालाविरोधात मिंधे गटाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 8 फेब्रुवारी 2024 रोजी सुनावणी होणार आहे. आमदार भरत गोगावले यांनी ही याचिका केली आहे. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदारांना अपात्र करावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली होती. ही मागणी फेटाळून लावण्यात आली, असा दावा गोगवले यांनी याचिकेत केला आहे. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिका दाखल झाल्यानंतर एक ते दोन दिवसांत त्याची सुनावणी घेतली जाते. त्यामुळे या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. याचिकेतील प्रतिवादी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर व अन्य यांना नोटीस जारी केली जात आहे, असे नमद करत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.