डोंबिवलीच्या हवेत केमिकल लोच्या! डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, श्वसनाचे रुग्ण वाढले

डोंबिवली एमआयडीसी परिसरात हवेतील प्रचंड दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वास घेताना त्रास होत होता. उग्र वासामुळे डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, श्वसनाचे रुग्ण वाढले आहेत. ‘केमिकल लोच्या ‘ला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गांभीर्य दाखवत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ६५० पेक्षा जास्त कंपन्या असून त्यात २०० कंपन्या या रासायनिक आहेत तर उर्वरित कापड उद्योग आणि इतर कंपन्या आहेत. काही कारखानदार नियम धाब्यावर बसवून उत्पादन घेतात. त्यामुळे प्रत्येक दोन-चार महिन्यांनंतर डोंबिवलीकरांना प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. आताही एमआयडीसी निवासी परिसरातील मिलापनगर, सुदामानगर, सुदर्शननगरमध्ये प्रदूषण वाढले आहे. उग्र वासाने वयोवृद्ध, रुग्ण, लहान मुले यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यासोबत डोकेदुखी आणि डोळ्यांचीही जळजळ होत आहे.

एमआयडीसीतील वाढत्या प्रदूषणाबाबत सुरेखा जोशी, वसंत शिंदे, महेश नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र अधिकारी कारखानदारांना पाठीशी घालत असल्याने डोंबिवलीकरांना प्रदूषण नियंत्रण मंडळाबाबत विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी एमपीसीबी, एमआयडीसीविरोधात सह्यांची मोहीम राबवली असून पुढील आठवड्यात दोन्ही कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिला.

पहाटेच्या वेळी घातक धूर, गॅस हवेत डोंबिवली एमआयडीसीत आठवड्यातील दोन ते तीन दिवस रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी मोठमोठ्या चिमण्यांद्वारे रासायनिक गॅस आणि घातक धूर हवेत सोडण्यात येतो. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता भाजपचे सरकार स्थापन होताच पुन्हा डोंबिवलीत प्रदूषण वाढले आहे.

चोरांच्या हाती तपास

प्रदूषणाच्या तक्रारीनंतर अधिकारी तपासणीसाठी कधी येणार हे कारखानदारांना आधीच कळते. त्यामुळे अधिकारी एमआयडीसी निवासी भागात येण्याआधी विषारी गॅस गायब झालेला असतो. बऱ्याचदा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगांच्या ‘कामा’ या संघटनेतील एका ठरावीक पदाधिकाऱ्यालाच पाठवून त्यांच्याकडून तपासणी केली जाते. हा सर्व प्रकार म्हणजे चोरांच्या हाती तपास असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.