गिरगावकरांना पुण्याची एसटी पकडायला वाशीला पाठवू नका! दादरचे मुंबई – पुणे एसटी स्टॅण्ड बंद करण्यावरून हायकोर्ट संतापले

दादर ब्रीजखालील मुंबई-पुणे एसटी स्टॅण्ड बंद करण्याची नोटीस महापालिकेने एसटी महामंडळाला धाडली आहे. यावरून उच्च न्यायालयाने पालिकेचे चांगलेच कान उपटले. पालिकेने मुंबई-पुणे स्टॅण्डसाठी तेथे जवळपास पर्यायी जागा द्यायला हवी. नाहीतर वाशीमध्ये या स्टॅण्डसाठी जागा देऊन गिरगावकरांना तेथे पुण्याची एसटी पकडायला पाठवू नका, असे खडेबोल न्यायालयाने पालिकेला सुनावले.

न्या. के.आर. श्रीराम व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. असे मुद्दे न्यायालयात यायलाच नकोत. प्रशासनाने ते सामोपचाराने सोडवायला हवेत. दादर ब्रीजखालील स्टॅण्ड बंद करायचा असेल तर या मुद्दय़ावर राज्य शासन व पालिकेने एकत्र बसून तोडगा काढावा, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.

टॅक्सी, अन्य वाहनांना का नाही दरडावत

मुंबईभर अवैध पार्किंग केली जाते. तुम्ही फक्त एसटीला का धमकावता. टॅक्सीसह अन्य वाहनांना का नाही दरडावत, असे न्यायालयाने पालिकेला फटकारले.

आम्ही पार्किंग करत नाही

ब्रीजखालील पार्किंग धोकादायक असल्याने ती काढून टाकावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने मुंबईतील सर्व ब्रीजखालील पार्किंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आम्ही दादरच्या ब्रीजखाली पार्किंग करत नाही. अगदी थोडय़ा वेळ्यासाठी महामंडळाच्या बसेस तेथे उभ्या असतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

एसटी महामंडळाने अॅड. अर्पणा कलाथील यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. दादर मुंबईच्या मध्यभागी आहे. मध्य व पश्चिम रेल्वेची स्थानके दादरला आहेत. त्यामुळे दादर येथून मुंबई-पुणे बस सेवा सुरू करण्यात आली. येथे उड्डाणपुलाचे बांधकाम झाल्यानंतर त्याखालील जागा या स्टॅण्डसाठी देण्यात आली. ब्रीजखालील पार्किंग काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामंडळाने दादर पुलाखालील स्टॅण्ड बंद करावा, अशी नोटीस पालिकेने दिली आहे. ही नोटीस रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

एसटीची पार्किंग का खुपते

बेकायदा इमारती उभ्या राहतात, त्याची तुम्हाला अडचण होत नाही. मात्र रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई-पुणे बसेस दादरच्या ब्रीजखाली उभ्या केल्या जातात. एसटीची पार्किंग तुम्हाला का खुपते, असे न्यायालयाने पालिकेला सुनावले.