हरयाणात पुन्हा हिंसाचार, महिला न्यायाधीशाची कार पेटवली

हरयाणाच्या नुंह येथील हिंसाचाराच्या तिसऱ्या दिवशीही राज्यातील चार जिल्ह्यांतील परिस्थिती तणावपूर्ण आहे. या चार जिल्ह्यांत निमलष्करी दलाच्या वीस कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. हिंसाचारात मृत्युमुखींची संख्या 7वर पोहचली आहे. नुंहमध्ये बुधवारी मध्यरात्री कर्फ्यू दरम्यान तावडू परिसरात काही लोकांनी दोन धार्मिक स्थळांवर आगेकूच केली. परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पलवलमध्ये बुधवारी रात्री तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळे आणि एका टेम्पोला आग लावली. यानंतर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 265 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नुंहमध्ये शुक्रवारी होणारी जुम्माची नमाज घरात करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुरुग्राममध्ये जुम्माच्या नमाजावरून पोलीस अलर्ट आहेत. नुंह, पलवल, फरिदाबाद तसेच गुरुग्रामच्या सोहना, मानेसर, पटोदी येथे 5 ऑगस्टपर्यंत इंटरनेट आणि एसएमएस सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, सीईटी स्क्रीनिंग चाचणीसाठी गुरुवारी दुपारी एक ते चार वाजेपर्यंत ही बंदी हटवण्यात आली होती.

हरयाणा सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी सेकंड इंडिया रिझर्व्ह बटालियन (आयआरबी)चे मुख्यालय नुंह जिल्ह्यात हलविले आहे. या बटालियनमध्ये एक हजार जवान आहेत. नुंह हिंसाचाराच्या तपासासाठी एक स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)ची आठ आणि तीन विशेष तपास पथके बनवण्यात आली आहेत. राज्यातील नऊ जिल्ह्यांत कलम-144 लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 166 जणांना अटक केली असून 96 जणांना ताब्यात घेतले आहे.