निवडणुका हलक्यात घेऊ नका अन् अतिआत्मविश्वास तर ठेवूच नका; हरयाणाच्या निकालांदरम्यान केजरीवालांची प्रतिक्रिया

हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काही वेळातच स्पष्ट होतील. दरम्यान सध्या मतमोजणी ही शेवटच्या टप्प्यावर आली असून हळूहळू निकाल समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये. सोबतच अतिआत्मविश्वास दाखऊ नका, असे विधान अरविंद केजरीवाल यांनी केले. ‘देवाने तुम्हाला जे काही दिले आहे त्यात आनंदी राहा आणि लोकांची सेवा करा आणि देशाची सेवा करा. आता निवडणुका येत आहेत. हरयाणाच्या निवडणुकीचे निकाल काय आहेत हे अद्याप कळलेले नाही. पण आजच्या निवडणुकांमधून सर्वात मोठा धडा घेतला पाहिजे. निवडणुका कधीही हलक्यात घेऊ नका. कधीही अतिआत्मविश्वास बाळगू नका, हा आजच्या निवडणुकीतील सर्वात मोठा धडा आहे. प्रत्येक निवडणूक अवघड असते. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंतर्गत कलह नसला पाहिजे’, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

एवढेच नाही तर या निवडणुकीत तुमची सर्वात महत्त्वाची भूमिका असेल, असेही ते पुढे म्हणाले. कारण आपण MCD मध्ये आहोत. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे साफसफाईसारख्या साध्या गोष्टीही कराव्यात, अशी लोकांची अपेक्षा आहे. बाकीच्या गोष्टी जनतेने माफ केल्या असतील. दररोज आपला परिसर झाडून कचरा गोळा करण्याचा प्रयत्न करा. एवढं काम केलं असेल तर, निवडणूक जिंकू, असा ठाम विश्वास यावेळी केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.