हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार, विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का

महायुतीमधील राजकारणाला कंटाळलेले पुणे जिह्यातल्या इंदापूरमधील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर ‘तुतारी’  हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.

हर्षवर्धन पाटील यांनी आज  शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजवर्धनही उपस्थित होते.

महायुतीमुळे राजकीय घुसमट

महायुतीच्या राजकारणामुळे हर्षवर्धन पाटील यांची राजकीय घुसमट झाली होती. 1995 पासून ते 2014 पर्यंत हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेत इंदापूरचे प्रतिनिधित्व केले, मात्र 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता महायुतीच्या जागावाटपात इंदापूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याने हर्षवर्धन पाटील हे नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात होते.