इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. इंदापुरात आल्यावर त्यांना माझ्यावर बोलल्याशिवाय राहवत नाही. का तर ते मोठे नेते आहेत. मात्र मी पहाटे उठून कुठे जात नाही. माझा कारभार जनतेमध्ये असतो, अशा शब्दांत हर्षवर्धन यांनी अजित पवार यांना डिवचले.
हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. त्या सभेत पाटील यांनी सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत. आम्हाला अभिमान आहे की, त्या चार वेळा खासदार झाल्या आहेत. पण त्यामध्ये तीन वेळा आमचा प्रत्यक्षपणे सहभाग होता. मात्र या वेळी या लोकसभेच्या निवडणुकीत आमचा अदृश्य सहभाग होता, असे जाहीर केले होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत टीका केली होती. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? एकीकडे तुम्ही आम्हाला घरी नेत जेवायला घालता आणि आता म्हणता अदृश्य प्रचार केला? असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवाल उपस्थित केले होते. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देत खोचक टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले, अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही सभेत काहीही बोलायला परवानगी असते. त्यामुळे सहाजिकच आहे की, ते इंदापूरमध्ये आल्यानंतर माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचं भाषण होत नाही. मात्र मी पहाटे उठून कुठे जात नाही. माझा कारभार जनतेमध्ये असतो. त्यांच्या या वक्तव्यामुळे इंदापूरच्या प्रचारात रंगत वाढली आहे.