‘हॅरी पॉटर’ फेम अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘हॅरी पॉटर’ मध्ये प्रोफेसरची भूमिका साकारणारी अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन झाले आहे. डेम मॅगी स्मिथ यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीला लंडनमधील ‘चेल्सी अँड वेस्टमिन्स्टर’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 27 सप्टेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधानाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेत्रीची दोन मुले ख्रिस लार्किन आणि टोबी स्टीफन यांनी त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. 27 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या काही काळ आजारी होत्या, अशी माहिती त्यांच्या मुलांनी दिली आहे.

डेम मॅगी स्मिथ यांनी ‘हॅरी पॉटर’ आणि ‘डाउंटन ॲबे’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. मॅगीने ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये 1952 मध्ये स्टेज परफॉर्मर म्हणून आपला प्रवास सुरू केला. पुढे 1958 साली ‘नोवेयर टू गो’ या सिनेमात पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या चित्रपटातून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. लोकांनी त्यांच्या विनोदी भूमिकांवर प्रचंड प्रेम कलं. ‘हॅरी पॉटर’मध्ये त्यांनी निभावलेली ‘प्रोफेसर मॅक्गोनागल’ या भूमिकाने प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवलं. ब्रिटिश वंशाच्या मॅगी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन ऑस्कर पुरस्कार जिंकले. त्यांनी 1970 मध्ये ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर आणि 1978 मध्ये ‘कॅलिफोर्निया सूट’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला होता.

हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत नाव असलेल्या डेम मॅगी स्मिथ यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटात सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे मित्र आणि कुटुंब हजर होतं.