हरिहरेश्वर ‘हिट ऍण्ड रन’ प्रकरण, मद्यपी आरोपी पोलिसांना सापडेना

पुण्यातून हरिहरेश्वरला आलेल्या मद्यपी पर्यटकांनी धुडगूस घातला होता. होम स्टे मालकाने रूम नाकारल्याने त्याला बेदम मारहाण करत महिलेला गाडीखाली चिरडून मद्यपी फरार झाले होते. शनिवारी रात्री ‘हिट ऍण्ड रन’ची घटना घडल्यानंतरही अजूनही आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

पुणे जिह्यातील चिंचवड येथील इरप्पा धोतरे, आकाश उपटकर, आकाश गावडे, नीरज उपटकर, आशीष सोनावणे, विकी सिंग, अलीम नागूर, सचिन जमादार, आदिल शेख, सचिन टिल्लू आणि अनिल माज हे 11 जण शनिवारी मध्यरात्री हरिहरेश्वरला आले होते. ममता ‘होम स्टे’ येथील अभी धामणस्कर यांच्याकडे त्यांनी राहण्यासाठी रूमची चौकशी केली. सर्व तरुण दारूच्या नशेत असल्याने धामणस्कर यांनी रूम देण्यास नकार दिला. यामुळे मद्यधुंद तरुणांनी धामणस्कर यांना मारहाण केली. भावाला मारहाण होत असल्याचे पाहून मदतीसाठी आलेली त्यांची बहीण ज्योती यांना मद्यपींनी गाडीखाली चिरडून ठार मारले होते. यानंतर अंधाराचा फायदा घेत सर्व जण पसार झाले. यातील विकास गावडे व विकी सिंग या दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.