सामूहीक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, भाजप नेत्यावर आरोप

उत्तराखंडच्या हरिद्वार येथे एक संतापजनक घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मदेह बहादराबाद येथे सापडला आहे. मृत मुलीच्याआईने भाजपचा स्थानिक कार्यकर्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून तिच्यावर सामुहीक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी शांतरशाह गावचे सरपंच आदित्यराज सैनी आणि त्यांचा सहकारी अमित सैनी याच्या विरोधात सामुहीक बलात्कार, हत्या आणि अन्य कलमांआधारे गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवस बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह मंगळवारी सकाळी महामार्गालगत सापडला. सुरुवातीला तिची ओळख पटली नाही मात्र तिच्या आईने मुलीची ओळख पटवली, मुलीच्या आईने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, सैनी आणि त्याचा सहकारी अमित याने तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली. एफआयआरनुसार, 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला अमित याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.

तक्रारीत महिलेने म्हंटले आहे की, 23 जूनच्या संध्याकाळी त्यांची मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि जेव्हा त्यांनी फोन केला त्यावेळी अमितने फोन उचलला आणि मुलगी त्याच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर काहीवेळाने मुलीचा फोन बंद येऊ लागला. महिलेच्या माहितीनुसार, मात्र सकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्याने त्यावेळी तिची आई सैनी याच्या घरी गेली. कारण अमित त्यांच्याकडेच राहत होता. त्या म्हणाल्या की, सैनी याने पोलिसांकडे न जाण्यासाठी दबाव टाकला आणि नाही ऐकल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

तक्रारीच्या आधारे, अमित सैनी आणि आदित्यराज सैनी यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 120B, 363, 366, 376A, 376D, 302, 506 आणि 5G/6 POCSO कायद्यान्वये हरिद्वारमधील बहाद्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू केला आहे. हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यात येत आहे. ते म्हणाले की, घटनेचा त्वरीत खुलासा करण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.